डॉल्बीविरोधात सोशल मीडियावरून राजकीय वॉर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

कोल्हापूर : गणेशोत्सवातील सिस्टीमचा (डॉल्बी) दणदणाट रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रशासन आणि तरुण मंडळांच्या वादामध्ये सोशल मीडियावरून राजकीय वॉर सुरू झाले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व पोलिस यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषण रोखण्यास मदत होत असल्यामुळे याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न म्हणून सोशल मीडियावरून नेत्यांनी मेसेज फिरवण्यास सुरवात केली आहे.

कोल्हापूर : गणेशोत्सवातील सिस्टीमचा (डॉल्बी) दणदणाट रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रशासन आणि तरुण मंडळांच्या वादामध्ये सोशल मीडियावरून राजकीय वॉर सुरू झाले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व पोलिस यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषण रोखण्यास मदत होत असल्यामुळे याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न म्हणून सोशल मीडियावरून नेत्यांनी मेसेज फिरवण्यास सुरवात केली आहे.

त्याला उत्तर म्हणून ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पाठिंबा देणाराही प्रचार सुरू झाला आहे. ऑनलाईन सर्वेक्षणाचा मार्ग यासाठी अवलंबला जात आहे. 2019च्या निवडणुकीच्या प्रचाराची पायाभरणीच या माध्यमातून करण्याचे काम राजकीय नेत्यांनी सुरू केले आहे. 

गणेशोत्सवाच्या आगमनादिवशी राजारामपुरी येथे पोलिसांनी कणखर भूमिका घेतली. या भूमिकेमुळे या परिसरात होणारे ध्वनिप्रदूषण थांबले. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांच्या मदतीने विसर्जन मिरणुकीतही सिस्टीमचा दणदणाट चालणार नाही, असे स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ठराविक क्षमतेपेक्षा आवाजाचा दणदणाट केल्यास कठोर कारवाई करू, असा इशारा देण्यात आला आहे. गतवर्षीही असाच इशारा देण्यात आला होता. परंतु, ऐनवेळी कारवाई सौम्य करण्यात आली. त्यामुळे यावर्षी काहीही झाले तरी कठोर कारवाई होणार, अशीच भूमिका प्रशासनाने घेतली आहे. 

चुकीची प्रथा असलेल्या दणदणाटाला विरोध केल्याने या संधीचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न नेत्यांकडून सुरू झाला आहे. तरुणांचा मोठा गट या दणदणाटाच्या बाजूने असल्याने तो आपल्याकडे खेचण्यासाठी, तसेच 2019च्या निवडणुकीचे लक्ष्य समोर ठेवून आतापासून याची सुरवात सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात असल्याचे चित्र आहे. पोलिसांच्या कारवाईला विरोध करण्यासाठी व्हॉट्‌स ऍप व अन्य सोशल मीडियाचा वापर करून विरोध दर्शवणारा प्रचार केला जात आहे. अगदी 2019 च्या निवडणुकीतील मतांची धमकीही दिली जात आहे. 'गतवर्षी नेत्यांनी पाठिंबा दिला होता; पण यावर्षी दादांनी विरोध केला...' या संदेशासह अनेक संदेश फिरत आहेत. 

पालकमंत्री लक्ष्य 
पालकमंत्री श्री. पाटील यांनाच जाणीवपूर्वक लक्ष केल्याचे दिसते. व्हॉट्‌स ऍपवर फिरणारे संदेश वाचले तर सरळसरळ याचा राजकीय फायदा घेण्यासाठीच हा प्रचार सुरू असल्याचे जाणवत आहे. प्रत्येक संदेश वाचल्यावर त्यामागील राजकीय हेतू स्पष्ट दिसत आहे. याला विरोध म्हणून सोशल मीडियावरून पाठिंबा देणारे संदेश आता फिरू लागले आहेत. ध्वनिप्रदूषणाने तोटा होतो, त्यामुळे घेतलेली भूमिका योग्य असल्याचे संदेश यातून देण्यात येत आहेत. काही जण डॉल्बीसाठी ऑनलाईन सर्वेक्षण घेत असून डॉल्बी नको, यासाठीही मोहीम सुरू असल्याचे दिसत आहे.