मोहरमचा पंजा, भवानी मंदिर आणि शिवछत्रपतींचे तख्त

मोहरमचा पंजा, भवानी मंदिर आणि शिवछत्रपतींचे तख्त

कोल्हापूर - मोहरमचा पंजा एखाद्या दर्ग्यात वाजत-गाजत गेला, पारंपरिक मार्गानेच त्याची मिरवणूक निघाली हे वातावरण सगळीकडेच आहे; पण मोहरमचा पंजा भवानी मातेच्या मंदिरात देवीसमोर आणि मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या तख्तास (आसन) भेट देण्यासाठी गेला, असे क्वचितच ऐकायला, पाहायला मिळते आणि ते मात्र कोल्हापुरात घडते. जुन्या राजवाड्यात संस्थानकाळापासून साजऱ्या होणाऱ्या मोहरमनिमित्त एका आगळ्या-वेगळ्या सामाजिक सलोख्याचे दर्शन कोल्हापुरात घडते.

जुन्या राजवाड्यात नगारखान्याच्या कमानीत ‘वाळव्याची स्वारी’ या नावाने पंजाची प्रतिष्ठापना होते. संस्थानकाळापासून या पंजाची प्रतिष्ठापना होते. नेमकी या पंजाची प्रतिष्ठापना कधीपासून सुरू झाली, याचा इतिहास माहीत नाही; पण एकूण परंपरा पिढ्यान्‌ पिढ्यांची आहे. या पंजाची नगारखान्याच्या कमानीत प्रतिष्ठापना होण्यापूर्वी तो जुन्या राजवाडा पोलिस स्टेशनसमोर असलेल्या कमानीत बसवत असत; पण ही कमान रस्ता रुंदीकरणात पाडल्यानंतर नगारखाना इमारतीत त्याची प्रतिष्ठापना सुरू झाली. 

या पंजाची पूजा-अर्चा छत्रपती ट्रस्टकडून होते. राजवाड्यातील जुन्या संदुकातून पंजाचे सर्व साहित्य बाहेर काढले जाते.
 मोहरमच्या दहा दिवसांच्या कालावधीत हा पंजा तीन वेळा नगारखान्यातून बाहेर पडला की, थेट समोरच्या भवानी मंदिरात नेला जातो. देवीच्या गाभाऱ्यासमोर 

पंजा थांबवला जातो. गाभाऱ्याच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचे तख्त (आसन) आहे. महाराणी ताराराणी यांनी करवीर संस्थानची स्थापना केली. त्यावेळी हे लाकडी तख्त सोबत आणले असा त्याचा इतिहास आहे. भवानी मंडपात हे तख्त सन्मानपूर्वक ठेवले आहे. या तख्तासमोर हा पंजा काही काळ थांबतो. दोन भिन्न धर्मांच्या सोहळ्याचा या ठिकाणी एक सुंदर मिलाफ होतो. धार्मिक सोहळे साजरे करताना त्यातून सलोखाही कसा जपता येतो, याचा भवानी देवीच्या मंडपात प्रत्यय येतो. 

या पंजाची सामाजिक सलोख्याची परंपरा त्याही पुढे आहे. कारण या पंजापुढे वाद्ये वाजविण्याचा मान कोरवी समाजाला आहे. विसर्जनादिवशी या पंजाचा ताबूत खांद्यावरून वाहून नेण्याचा मान भोई समाजाला आहे. रोजच्या नैवेद्याची परंपरा थेट राजवाड्यातून आहे. हा पंजा मिरवणुकीसाठी बाहेर पडतो त्यावेळी तो बिंदू चौक तटबंदीच्या बुरजाजवळ असलेल्या शिंदे यांच्या घरी नेला जातो. तेथून नंगीवली दर्गा, लाड चौक, सणगर गल्ली, बोडके गल्ली, बोंगाळे निवासस्थान, अवचितपिर, बाबूजमाल, गंगावेश भाऊ नाईकांचा वाडा, पंचगंगा तालीम, ब्रह्मपुरी टेकडी व पंचगंगा नदीवर जातो. या सर्व सोहळ्यात सर्व समाजातील लोकांचा मोठा सहभाग असतो. मुस्लिम बांधव विधीत अग्रभागी असतात. धर्म, जात विसरून सगळे एका सोहळ्यात दहा दिवस सहभागी होत राहतात. 

भाऊ नाईकांचा वाडा
या मोहरमच्या निमित्ताने गंगावेशीतील भाऊ नाईकांचा वाडा चर्चेत येतो. गंगावेश चौक म्हणजे शहरातील २४ तास वर्दळीचे ठिकाण. येथे एका छोट्या गल्लीत भाऊ नाईक यांचा मोठा वाडा आहे. हे भाऊ नाईक म्हणजे संस्थानकाळातील कोल्हापुरातील एक मोठे व्यक्तिमत्त्व. या वाड्याने खूप जणांना आधार दिला. कोल्हापूरचे सलग चार वेळा आमदार असलेले त्र्यं. सि. कारखानीस यांनी अखेरच्या काळात याच वाड्यात आपला काळ व्यतीत केला. या वाड्यास मोहरमच्या काळात नगारखान्यातला पंजा भेट द्यायला येतो. 

सर्वधर्मसमभाव असा जपावा
‘वाळव्याची स्वारी’ या पंजास मोर्चेल व चवऱ्याचा संस्थानी मान आहे. मोर्चेल म्हणजे मोराच्या पिसाचे व चांदीच्या मुठीचे एक मानाचे प्रतीक. संस्थानकाळात राजे सिंहासनावर बसले की, दोन्ही बाजूंना मोर्चेल असलेले सेवक उभे असत. तशाच मोर्चेलचा मान कोल्हापूरच्या राजघराण्याने मोहरमच्या या पंजास दिला आहे. राजा सर्वधर्मसमभाव जपणारा कसा असावा लागतो, याचेही हे उदाहरण आहे. 

वाळव्याची स्वारी या पंजासमोर हिंदू-मुस्लिम भाविक रस्त्यावरच आडवे झोपतात. त्यांना ओलांडून पंजा मिरवणुकीने पुढे पुढे जातो. धर्म कोणताही असो, त्याच्यापुढे सर्व समान असाच संदेश यातून दिला जातो. आजही या प्रथेचे पालन केले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com