गणेशोत्सवात थर्माकॉलला ‘बाय बाय’

गणेशोत्सवात थर्माकॉलला ‘बाय बाय’

सातारा - उच्च न्यायालयाने थर्माकॉलवरील बंदी कायम ठेवल्याने यंदाच्या गणेशोत्सवात थर्माकॉलची आरास करता येणार नाही. थर्माकॉल बंदीचे पर्यावरणप्रेमींसह नागरिकांतून स्वागत होत आहे. मात्र, मार्चपूर्वीच व्यावसायिक, कारागिरांनी थर्माकॉलची आरास, मंदिराचे काम ६० ते ७० टक्‍के पूर्ण केल्याने यावर्षी मुदतवाढ द्यायला हवी, अशी मागणी होत आहे. मात्र, या बंदीवर सरकार व न्यायालयही ठाम असल्याने यंदाच्या गणेशोत्सवात थर्माकॉलला ‘बाय बाय’च असू शकते. 

प्लॅस्टिक आणि थर्माकॉल दोन्ही घटक पर्यावरणासाठी घातक असून, यामुळे अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण होत असल्याने राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने प्लॅस्टिक आणि थर्माकॉलवर बंदी घातली. त्याविरोधात थर्माकॉल बनविणारे काही व्यापारी उच्च न्यायालयात गेले होते. मात्र, न्यायालयाने प्लॅस्टिकबरोबरच थर्माकॉलवरील बंदीही कायम ठेवली.

त्यामुळे दर वर्षी गणेशोत्सवात दिसणारी थर्माकॉलची आरास, मंदिरे यंदा दिसणार नाहीत. गणेशोत्सवात घरोघरी आरास केली जाते. थर्माकॉलची रंगीत मंदिरे, मखरांमुळे उत्सवाला शोभा येते. मात्र, गणेशोत्सवानंतर या थर्माकॉलचा कचरा होतो. त्याचे विघटन होत नसल्याने ते इतरत्र पडते. या दुष्परिणामांमुळेच प्लॅस्टिक आणि थर्माकॉलवर न्यायालयाने बंदी घातली. थर्माकॉलला पर्याय शोधून गणेशोत्सवाची आरासही पर्यावरणपूरक करण्याचा संकल्प नागरिकातून व्यक्त होत आहे. 

दुसरीकडे शासनाने कोणतीही सूचना न देता थेट थर्माकॉलवर बंदी घातली असल्याने अन्याय झाल्याची भावना व्यावसायिक, विक्रेते, कारागिरांत आहे. गेल्या वर्षीचा गणेशोत्सव संपल्यानंतर लगेच मखर, आरास बनविण्यास सुरवात केली होती. त्यामुळे मार्चपर्यंत सुमारे ६० ते ७० टक्‍के काम पूर्ण झाले आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गुंतला आहे. हा स्टॉक संपविण्यासाठी सरकारने किमान यावर्षी तरीही बंदी शिथिल करावी. पुढील गणेशोत्सवापासून त्यावर पर्याय शोधण्यास तयार असल्याचे म्हणणे व्यावसायिकांचे आहे.

गणेशोत्सवात केवळ दहा टक्‍केच थर्माकॉल वापरले जाते. शिवाय, त्याचा पुनर्वापर केला जातो. उरलेले ९० टक्‍के वस्तूंच्या पॅकेजिंगसाठी वापरले जाते. सरकारने बंदी लागू करण्यापूर्वीच मखर, आरासचे साहित्य बनविले आहे. त्याची विक्री न झाल्यास व्यावसायिक, कारागिरांवर उपासमारीची वेळ येईल. शासनाने बनविलेले साहित्य विक्रीची संधी द्यावी.
- अनिल कांबळे, थर्माकोल मंदिर विक्रेते, सातारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com