दिवळीतला गणपती..!

Ganpati
Ganpati

आमच्या गल्लीत कुंभार जास्त असल्याने या गल्लीला ‘कुंभार गल्ली‘ म्हणतात. त्यातही आमचे शेजारीही कुंभारच आहेत. त्यामुळे गणपती जवळ आल्याची चाहूल त्यांच्याकडूनच लागायची. चिखलाचा गणपती कसा करतात, हे बघायची उत्सुकता असायची. त्यामुळे शाळा सुटली, की शेजारी जाऊन बसायचो. भगवान शंकरांनी गणपतीला हत्तीचं तोंड बसवलं होतं, ही दंतकथा ऐकली होती आणि ती खरीही वाटायची; पण कुंभार मूर्ती तयार करत असताना बघायचो, तेव्हा लक्षात यायचं की चिखलाच्या गणपतीचं तोंड कुंभारच बसवतोय.. मग मात्र मनात गोंधळ उडायचा. हा गोंधळ कुणाला सांगायचं म्हटलं, तर लोक आपल्याला वेड्यात काढतील असं वाटायचं. मग तो गोंधळ तसाच बाजूला सारून गप्प बसून मूर्ती कशी तयार करतात हे पाहत बसायचो.. 

आई-बाबा शेतकरी असल्याने आमचा गणपती बयत्यावरचा (कुंभाराला गणपतीच्या मूर्तीच्या बदल्यात भात घालणे) असायचा. गणपतीही दिवळीत (भिंतीला असणारी खिडकी) बसेल, एवढाच ठरवायचो. त्यासाठी दिवळीची उंची सुतळीने मापून घेऊन कुंभारांकडे जात असू आणि त्याच उंचीचा गणपती ठरवत असू. तोही कच्चाच गणपती घेत असू. कारण नंतर मनाला हवा तसा रंग त्याला करून घ्यायचो. एकदा गणपती ठरला, की मग गव्हाच्या पिठाची खळ करून दिवळीच्या बाजूने भिंतीला रंगबिरंगी कागद चिकटवले जायचे. ‘घरातील मोठा मुलगा‘ या नात्याने मीच गणपती घरात आणत असे. आरतीच्या वेळी घंटा वाजवायला मात्र लहान भावाकडे द्यावी लागत असे; पण कधी कधी ‘तो नीट वाजवत नाही‘ म्हणत मी त्याच्याकडून परत घेत असे. 

शाळेतून ज्युनिअर कॉलेजमध्ये गेलो, तसा दिवळीतील गणपती टेबलावर आला. आईच्या नव्या साड्या आणि बाबांना सन्मानाखातर मिळालेल्या फेट्यांची कमान करत असे. पदवीसाठी मी कोल्हापूरला कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. काही वर्षांनी सुतळीचं मापही हातातून सुटलं. आता गणपती दिवळीतून टेबलवर आला होता आणि तोही मोठा झाला होता. साडी-फेट्याच्या कमानीतून बाहेर येत तो थर्माकोलच्या कमानीत बसला होता. 

माझ्याप्रमाणे गणपतीमध्येही खूप बदल झाले होते. मी शाळेत असताना पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी असा माझा पोशाख होता. त्यावेळी गणपतीही चिखलाचा असे. कॉलेजला गेल्यानंतर मी जीन्स-टीशर्ट घालायला लागलो, तेव्हा गणपतीने ‘पी.ओ.पी‘चा झाला होता. 

करिअर करण्यासाठी आधी गाव सुटलं..नंतर देशही सुटला.. आज मी, माझा लहान भाऊ आणि बहीण तिघेही दुबईत आहोत. या वर्षी पहिल्यांदाच आम्ही घरचा गणपती बसवायला घरी नाही. आई-बाबा आम्हाला खूप ‘मिस‘ करत आहेत आणि आम्हीही त्यांना, आमच्या गणपतीला ‘मिस‘ करतोय.. गणरायाच्याच आशीर्वादाने आज आमचं जीवन विविध रंगांनी भरून गेलं आहे.. अगदी त्याच्या मूर्तीतील रंगांप्रमाणे..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com