कर्नाटकला द्या चार टीएमसी पाणी - सिद्धरामय्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

सोलापूर - कर्नाटक राज्यातील 176 पैकी 160 तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्या ठिकाणच्या लोकांना पिण्याच्या पाण्याची गरज भासत आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्नाटकातील लोकांना पिण्यासाठी चार टीएमसी पाणी देण्याची मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

सिद्धरामय्या यांनी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात मागणीचे पत्र फडणवीस यांच्याकडे दिले आहे. सिद्धरामय्या यांच्याशिवाय राज्यसभा खासदार प्रभाकर कोरे, निपाणीच्या भाजपच्या आमदार शशिकला जोळ्ळे यांनीही मागील आठवड्यात कर्नाटकला पिण्यासाठी पाणी देण्याची मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या काळम्मावाडी धरणातून दूधगंगा नदीत दोन, तर वेधगंगा नदीत एक टीएमसी पाणी सोडण्यात यावे. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात असलेल्या उजनी धरणातून भीमा नदीमध्ये एक टीएमसी पाणी सोडावे, अशीही मागणी सिद्धरामय्या यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे.

कर्नाटकातील प्रामुख्याने कृष्णा व भीमा नदीच्या खोऱ्यातील भागामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न बिकट झाल्याने काळम्मावाडी व उजनी धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारने कर्नाटकला दोन टीएमसी पाणी दिले होते. त्याचा कर्नाटकाला खूपच फायदा झाला होता. त्या वेळी झालेल्या करारानुसार त्या दोन टीएमसी पाण्याच्या बदल्यात "इंडी ब्रॅंच'मधून 0.78 टीएमसी पाणी महाराष्ट्राला दिले होते. त्याचा फायदा सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांना झाला होता. करारात ठरल्यानुसार उर्वरित 1.22 टीएमसी पाणी नारायणपूर धरणातून "इंडी ब्रॅंच कॅनॉल'च्या माध्यमातून देण्यात येणार आहे. त्याचा फायदा सोलापूर जिल्ह्याला होणार असल्याचा उल्लेखही सिद्धरामय्या यांनी पत्रात केला आहे.