सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्‍वराचे नाव देण्यावर आजही ठाम - प्रा. मनोहर धोंडे

प्रमोद बोडके
सोमवार, 28 मे 2018

शिवा संघटनेच्यावतीने दाखल केलेल्या याचिकेवर आता 5 जूनला सुनावणी आहे. आम्ही सिद्धेश्‍वराच्या नावावर ठाम असलो तरीही चर्चेची तयारी कायम ठेवली आहे. न्यायालयाचा निकाल आमच्याच बाजूने लागले असा विश्‍वासही प्रा. धोंडे यांनी व्यक्त केला. 
 

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्‍वराचे नाव द्यावे या मागणीवर आम्ही आजही ठाम आहोत. न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आमच्या बाजूनेच न्याय मिळेल असा विश्‍वास आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी न्यायप्रविष्ट बाबीचा विचार न करता विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा व नामविस्ताराचा कार्यक्रम 31 मे ला घेण्याचे जाहीर करून घाई केल्याचे मत शिवा संघटनेचे संस्थापक प्रा. मनोहर धोंडे यांनी व्यक्‍त केले. 

सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर प्रा. धोंडे यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. प्रा. धोंडे म्हणाले, धनगर समाज व लिंगायत समाज हे गुरुबंधू आहेत. त्यांच्यात सामाजिक तेढ निर्माण होऊ नये ही आमची भावना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या घोषणेचा मान राखून आम्ही दोन पावलं मागे येऊ परंतु त्या बदल्यात महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रमुख आठ मागण्या मान्य करायला हव्यात. या मागण्या मान्य करण्याचे शासनाने तत्वत: मान्यही केले आहे परंतु जोपर्यंत या मागण्यांचे शासन आदेश निघत नाहीत तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. शिवा संघटनेच्यावतीने दाखल केलेल्या याचिकेवर आता 5 जूनला सुनावणी आहे. आम्ही सिद्धेश्‍वराच्या नावावर ठाम असलो तरीही चर्चेची तयारी कायम ठेवली आहे. न्यायालयाचा निकाल आमच्याच बाजूने लागले असा विश्‍वासही प्रा. धोंडे यांनी व्यक्त केला. 

लिंगायत धर्म मान्यतेला 'शिवा'चा विरोध 
शिवा संघटनेला लिंगायत धर्म मान्य नाही. आमचा धर्म हा वीरशैव लिंगायत आहे. लिंगायत धर्माला संवविधानिक मान्यता व अल्पसंख्याकाचा दर्जा मिळविण्यासाठी काही मंडळी कर्नाटकानंतर महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात मोर्चे काढत आहेत. शिवा संघटनेचा लिंगायत धर्माला विरोध असून सोलापूरला होणाऱ्या व महाराष्ट्रात भविष्यात निघणाऱ्या या मोर्चात सहभागी होऊ नये असे आवाहनही प्रा. धोंडे यांनी केले. 

म्हणून गेले सिध्दारामय्यांचे गेले सरकार 
कर्नाटकाचे कॉंग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे काम खूप चांगले आहे. या कामाच्या आधारावर ते पुन्हा सत्ता मिळवतील अशीच सर्वांना आशा होती. त्यांनी लिंगायतच्या स्वतंत्र धर्म मान्यतेचा केलेला ठराव त्यांना सत्ता गमाविण्यास कारणीभूत ठरल्याचे प्रा. धोंडे यांनी सांगितले. त्यांनी लिंगायत समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याने कर्नाटकातील जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याचेही प्रा. धोंडे यांनी सांगितले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Giving the name of Siddeshwar to Solapur University Issue