पाखरांसाठी सांगलीकरांची साद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

सांगली - ‘प्रत्येकाला आपल्या जगण्याचं पडलं असताना पक्ष्यांच्या निवाऱ्याचं काय घेऊन बसलात राव..!’ अशा भोवतालात आज जाणत्या सांगलीकरांनी आजची सकाळ पक्ष्यांच्या भवितव्यासाठी खर्च केली. आपल्या सभोवताली गुंजन करणाऱ्या पक्ष्यांनाही आपल्याइतकाच जगण्याचा हक्क आहे. त्यांचं सहअस्तित्व मान्य करून नव्या पिढीपर्यंत तो संदेश द्यायचा आजचा दिवस होता. जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, संघटनांनी एकत्र येत हा निर्धार केला. यानिमित्ताने शहरातील प्रमुख मार्गावरून पक्षी दिंडी काढतानाच येथील शास्त्री उद्यानात दक्षिण महाराष्ट्रातील पहिल्या पक्षी शुश्रूषा केंद्राचीही सुरवात झाली.

सांगली - ‘प्रत्येकाला आपल्या जगण्याचं पडलं असताना पक्ष्यांच्या निवाऱ्याचं काय घेऊन बसलात राव..!’ अशा भोवतालात आज जाणत्या सांगलीकरांनी आजची सकाळ पक्ष्यांच्या भवितव्यासाठी खर्च केली. आपल्या सभोवताली गुंजन करणाऱ्या पक्ष्यांनाही आपल्याइतकाच जगण्याचा हक्क आहे. त्यांचं सहअस्तित्व मान्य करून नव्या पिढीपर्यंत तो संदेश द्यायचा आजचा दिवस होता. जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, संघटनांनी एकत्र येत हा निर्धार केला. यानिमित्ताने शहरातील प्रमुख मार्गावरून पक्षी दिंडी काढतानाच येथील शास्त्री उद्यानात दक्षिण महाराष्ट्रातील पहिल्या पक्षी शुश्रूषा केंद्राचीही सुरवात झाली. पक्ष्यांचा हक्काचा निवारा असलेली शहरातील वनसंपदा टिकवतानाच उद्यानांच्या सुशोभीकरणाचा संकल्प झाला. चला पक्षी वाचवूया... या सकाळ माध्यम समूहाच्या आवाहनाला प्रतिसाद देत निसर्गातील सहअस्तित्वाच्या मूळ मंत्राचा जागर झाला.

सांगली, मिरज कुपवाड शहर महापालिका, सांगली वन विभाग, इंडियन मेडिकल असोसिएशन, ॲनिमल सहारा फाऊंडेशन, खोपा बर्ड हाऊस, ॲनिमल राहत, इन्साफ फाउंडेशन, बर्ड साँग्स्‌, डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप, वेलनेस, रॉयल्स यूथ स्टुडंट फाऊंडेशन यांच्यासह विविध संस्थांनी गेले महिनाभर या मोहिमेसाठी शहरात मोठी जागृती मोहीम राबवली होती. विविध राजकीय संघटना, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, विविध शाळा-महाविद्यालयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहराचे प्रथम नागरिक महापौर हारुण शिकलगार, पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, आयुक्त रवींद्र खेबुडकर, उपमहापौर विजय घाडगे, नगरसेवक शेखर माने, उपायुक्त सुनील पवार, विभागीय वनाधिकारी समाधान चव्हाण, वनक्षेत्रपाल अनिल निंबाळकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. अनिल मडके, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक शेखर जोशी, वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) उदय देशपांडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत येथील राम मंदिर चौकातून फेरीला प्रारंभ झाला. पंचमुखी मारुती रस्ता, स्टॅंड रस्ता मार्गे फेरीची लालबहाद्दूर शास्त्री उद्यानात सांगता झाली. तेथे झालेल्या कार्यक्रमात या शहरातील पक्षी वैभव जतन करण्यासाठीच्या विविध उपक्रमांची सुरवात झाली. एका भविष्यवेधी उपक्रमाची ही सुरवात ठरली. 

मान्यवरांच्या उपस्थितीत शहरातील पाच उद्यानांत लावण्यात येणाऱ्या कृत्रिम घरट्यांचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यानंतर जखमी घारीला उपचारानंतर निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले. सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी प्रास्ताविक केले. ‘यिन’ची सदस्या पोर्णिमा उपळावीकर हिने सूत्रसंचालन केले, तर ॲनिमल सहाराच्या पुष्पा काशीद यांनी आभार मानले. 
 

बऱ्याचदा पक्षी-प्राणी जखमी अवस्थेत सापडला तरी फोन येतात. मगर दिसली तर ती पकडून न्या, म्हणून सांगितले जाते. आपले अस्तित्व सर्व पक्षी-प्राण्यांच्या अस्तित्वासोबत जोडले आहे. त्यासाठीची जाणीव जागृती अशा उपक्रमांमधून अपेक्षित आहे. भविष्यात ही जाणीव शाळा-महाविद्यालयांसह सर्व स्तरांवर निर्माण करण्यासाठी आपण सारे एकत्रितपणे काम करूया.
- समाधान चव्हाण, विभागीय वनाधिकारी

महापालिकेची सर्वच उद्याने विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. शहरातील वनसंपदा टिकवणे आणि त्यात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया. इथले पक्षी शुश्रूषा केंद्र भविष्यात प्राणी शुश्रूषा केंद्र म्हणूनही लौकिक मिळवेल.
- विजय घाडगे, उपमहापौर

पक्ष्यांचे अस्तित्व आपल्या अस्तित्वाचाच भाग आहे. शहरातील उद्यानांचे सुशोभीकरण करण्यात येईल. इथे सुरू झालेल्या पक्षी शुश्रूषा केंद्रासाठी महापालिका सर्वतोपरी मदत देईल.
- आयुक्त रवींद्र खेबुडकर

गेल्या पाच-सहा वर्षांपासून सर्वच संघटना एकत्रितपणे काम करीत आहेत. यापुढच्या काळात जखमी पक्ष्यांवर उपचार करणे आणि त्यांची काळजी घेण्यासाठी नेमके काय केले पाहिजे, याबद्दल व्यापक जागृती मोहीम सुरू करू.
- शरद आपटे, पक्षी अभ्यासक

तुकड्या तुकड्यात काम करणाऱ्या सर्व प्राणीमित्र संघटनांना एकत्र आणण्याचे काम ‘सकाळ’ने केले. यापुढच्या काळात हे काम अधिक जोमाने करण्याचा उत्साह मिळाला आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंतच हा संदेश पोहोचवला पाहिजे.
- प्रा. शशिकांत ऐनापुरे, डॉल्फिन नेचर ग्रुप

आपल्या सभोवताली आजही पक्षी आहेत, मात्र गोंगाटात त्यांचे अस्तित्वच जाणवणे बंद झाले आहे. त्यांचे आवाज लक्ष देऊन ऐका. तुमच्या जगण्याची समृद्धी वाढेल. त्यांच्या अस्तित्वाची चिंता ही सर्वांनाच असायला हवी.’’
- डॉ.अनिल मडके, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, सांगली

शहरातील विविध सेवाभावी प्राणीमित्र संघटना गेली अनेक वर्षे निरपेक्ष भावनेने काम करीत आल्या आहेत. त्यांच्या मागे बळ उभे करण्यासाठी महापालिका-वन विभागासह विविध शासकीय यंत्रणा उभ्या ठाकल्या आहेत. ही मोठ्या कामाची सुरवात आहे.
- शेखर माने, अध्यक्ष- रॉयल यूथ क्‍लब

मूक-बधिर प्रशिक्षकांचा बोलका सहभाग
माधवनगर येथील मूक-बधिर क्रीडा प्रशिक्षक राजू माळी व संजू माळी यांनी उत्स्फूर्तपणे दिंडीमध्ये सहभाग दर्शवला. ‘सकाळ’च्या कार्यालयापासून दिंडीची सुरवात होण्यापूर्वीच शाळकरी मुलांना रांगेत उभे करून शिस्त लावली. दिंडीच्या मार्गावर त्यांनी वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून नियंत्रण ठेवले.

Web Title: global sparrow day