विविधतेमुळे लोकशाहीची परिपक्वता वाढली - ऍड. असीम सरोदे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

कोल्हापूर - भारतीय राजकारण हे बहुसंस्कृतीचे आहे, म्हणूनच लोकशाही जिवंत असून देशातील विविधतेमुळे लोकशाहीची परिपक्वता वाढली, असे मत प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी व्यक्त केले. 

कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) 54 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात ऍड. सरोदे यांनी "लोकशाही औपचारिकताच राहिली काय?' या विषयावर आपले विचार मांडले. या कार्यक्रमात "गोकुळ' ला जास्तीत जास्त, चांगल्या प्रतीचा दूधपुरवठा करणाऱ्या 13 संस्थांना रोख बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. 

ते म्हणाले, ""सगळे मिळून निर्णय घेण्याची प्रकिया म्हणजे लोकशाही. त्याची सुरवात घरापासून दिल्लीपर्यंत असावी. निवडून आलेले लोक पक्षाशी बांधिलकी ठेवतात, लोकांशी नाही. यासाठी राजकीय पक्षांचे अवास्तव महत्त्व कमी झाले पाहिजे.'' 

ते म्हणाले, ""लोकांना काय पाहिजे हे समजून घेऊन काम करण्याची गरज आहे. लोकशाहीतील मूलभूत हक्कांबद्दल लोकांनी बोललेच पाहिजे. लोकांच्या लायकीप्रमाणे नेते मिळत आहेत; पण विकासासाठी चिरंतन टिकाऊ काम करावे लागेल. चांगल्या माणसांची गरज राजकारण्यांना आहे, म्हणून चांगल्या लोकांनी राजकारणात येण्याची गरज आहे.'' 

लोकशाहीत सामान्य माणसाला "मत' मिळाले; पण "पत' मिळाली नाही, असे सांगून ऍड. सरोदे म्हणाले, ""कॉंग्रेसमुक्त भारत झाला तरी लोकांवर त्याचा कोणताही फरक पडणार नाही. कारण इकडचे काही लोक तिकडच्या फांदीवर बसलेले असतील. समाजात क्रांती करणारे व बदल घडवणारे लोक असलेच पाहिजेत.'' 

प्रास्ताविक करताना विश्‍वास पाटील यांनी "गोकुळ'च्या प्रगतीचा आढावा घेतला. जिल्ह्यात कितीही स्पर्धक आले तरी "गोकुळ'चा डौल हा कायम राहील, असा विश्‍वास कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी व्यक्त केला. संचालक रवींद्र आपटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संचालक अरुण डोंगळे, दीपक पाटील, पी. डी. धुंदरे, उदय पाटील, राजेश पाटील, बाळासाहेब खाडे, सत्यजित पाटील, अनुराधा पाटील-सरूडकर, जयश्री पाटील- चुयेकर, रामराजे कुपेकर उपस्थित होते. 

या संस्थांचा गौरव 
संघाला जास्तीत जास्त, चांगल्या प्रतीचे दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यात आला. या संस्था अशा 
1. गाय-म्हैस जास्त दूध पुरवठा - प्रथम- हनुमान, वडकशिवाले, द्वितीय- राम कृषिपूरक, चुये, तृतीय- उदय, पोर्ले, ता पन्हाळा 
2. म्हैस जास्त दूध पुरवठा - प्रथम- शिवपार्वती- नूल, द्वितीय- लक्ष्मी, खणदाळ, तृतीय- हनुमान, मुगळी (सर्व ता. गडहिंग्लज) 
3. म्हैस उत्तम प्रत दूध - प्रथम- मोकाशी, नांगणूर, गडहिंग्लज, द्वितीय- भाग्यलक्ष्मी, नरेवाडी, ता. गडहिंग्लज, तृतीय- सहकार, रुई 
4. जास्त दूध महिला संस्था - प्रथम- मंगलमूर्ती, जांभळी, शिरोळ, द्वितीय- महालक्ष्मी- चुये, करवीर, तृतीय- जनसेवा, पाडळी, करवीर 

Web Title: Gokul Anniversary