सुवर्णकन्या रेश्‍मा माने हिचा सत्कार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - सिंगापूरला झालेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत 63 किलो वजन गटात सुवर्णपदक मिळविल्याबद्दल वडणगेची सुवर्णकन्या रेश्‍मा माने हिचा सत्कार न्यू पॅलेस परिसरातील छत्रपती शाहू विद्यालयात झाला. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी रेश्‍माचा शाल, पुष्पहार देऊन सत्कार केला. या वेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी दिलेल्या एक लाख रुपयांचा धनादेश डॉ. सैनी यांनी रेश्‍माकडे सुपूर्द केला. 

आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक राम सारंग म्हणाले, ""वयाच्या आठव्या वर्षांपासून रेश्‍मा कुस्ती क्षेत्रात करिअर करण्यासाठी अपार मेहनत घेत आहे. रेश्‍माने ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळविण्यासाठी माझा प्रयत्न राहील.'' 

हिंदकेसरी दीनानाथसिंह म्हणाले, ""लहान असताना बनारसमध्ये मी राजर्षी शाहू महाराज यांचे नाव ऐकले होते. लहानपणी आम्हाला आई-वडील म्हणत असत की, तू चांगली कुस्ती कर. तुला कोल्हापूरला शिकण्यासाठी पाठवितो. राजर्षी शाहू महाराज यांनी मातीवरील कुस्ती इथे फुलविली. आताचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे मॅटवरील कुस्ती जोपासण्यासाठी प्रयत्न करत आहेत, हे महत्त्वाचे. ते नवोदित खेळाडूंना सातत्याने प्रेरणा देत आले आहेत.'' 

कुबेर शेडबाळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शर्मिला करवीरकर यांनी आभार मानले. ट्रस्टी डी. एन. इंगळे, विष्णू जोशीलकर, प्राचार्य राजश्री पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 

रेश्‍माचे आई वडील ब्रॅंड ऍम्बॅसिडर... 
डॉ. सैनी म्हणाले, ""जिल्ह्यात मुलींची संख्या कमी आहे. गर्भपाताचे प्रमाणही जास्त आहे. एका अर्थाने जिल्ह्याला ही बाब निश्‍चितच शोभणारी नाही; पण रेश्‍माने आंतरराष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले, ही जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. आता आम्ही जिल्ह्यात मुलगी वाचवा, मुलगी शिकवा हे अभियान सक्षमपणे राबविणार आहोत. याकरीता रेश्‍माच्या आई-वडिलांना या अभियानाचे ब्रॅंड ऍम्बॅसिडर करण्यात येईल. त्यांच्याद्वारे ही मोहीम जिल्हाभर नेण्यात येईल.'' 

Web Title: Golden girl reshma nane