‘महावितरण’ला सापडला अधिकारी!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

गोंदवले - वीज वितरण कंपनीच्या येथील शाखेला अखेर अधिकारी मिळाल्याने लोकांची रखडलेली कामे मार्गी लागण्याची आशा व्यक्त होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या शाखेतील अधिकारी हरवल्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच कार्यकारी अभियंत्यांनी तातडीने कार्यवाही केल्याने ‘सकाळ’चेही अभिनंदन होत आहे.        

गोंदवले - वीज वितरण कंपनीच्या येथील शाखेला अखेर अधिकारी मिळाल्याने लोकांची रखडलेली कामे मार्गी लागण्याची आशा व्यक्त होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या शाखेतील अधिकारी हरवल्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच कार्यकारी अभियंत्यांनी तातडीने कार्यवाही केल्याने ‘सकाळ’चेही अभिनंदन होत आहे.        

गोंदवले खुर्दमध्ये असणाऱ्या या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात गेल्या आठ- नऊ महिन्यांपासून शाखा अभियंताच उपस्थित नव्हते. परिणामी तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुक, आदर्शगाव लोधवडे, किरकसाल यासह १५ गावांतील ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. नवीन कनेक्‍शन, वीज बिलांची दुरुस्ती आदी कार्यालयीन कामांसाठी लोकांना हेलपाटे मारावे लागत होते. याशिवाय सध्याच्या पाऊस व वाऱ्याच्या दिवसांत अनेक गावांमध्ये वीजपुरवठा तासन्‌तास गायब होऊन लोकांच्या अडचणी सोडविण्यात अडचणी येत होत्या. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनदेखील कसलीही कार्यवाही होत नसल्याने लोकांमधून संताप व्यक्त होत होता. यासंदर्भात ‘सकाळ’ने ‘वीज कंपनीचा अधिकारीच हरवला’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. त्याच दिवशी दहिवडी येथे ‘महावितरण’च्या ग्राहक संपर्क अभियानासाठी कार्यकारी अभियंता ए. पी. यादव, कनिष्ठ अभियंता श्री. रजपूत, सर्व शाखा अभियंते यांच्या उपस्थितीत ‘सकाळ’मधील वृत्ताबाबत चर्चा करण्यात आली. वस्तुस्थिती लक्षात घेऊन श्री. यादव यांनी तातडीने मलवडी येथील शाखा अभियंता डी. ए. पवार यांना गोंदवले खुर्द येथे आठवड्यातून दोन दिवस काम करण्याबाबत आदेश दिले. त्यामुळे आता प्रत्येक बुधवारी व शुक्रवारी गोंदवले कार्यालयात शाखा अभियंता उपस्थित राहून काम पाहणार आहेत. याशिवाय तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुक येथेही वीज कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या कार्यालयांर्गत असणाऱ्या १५ गावांतील समस्या सुटणार असल्याने ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत आहे.   

‘सकाळ’च्या अभिनंदनाचा ठराव
वीज कंपनीच्या कारभाराविरोधात गोंदवले बुद्रुक ग्रामपंचायतीने आंदोलन करण्याचा ठराव केला होता; परंतु ‘सकाळ’च्या वृत्तानंतर तत्काळ अधिकारी दिल्याने ग्रामसभेत ‘सकाळ’च्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.          

महावितरणाबाबत पुढील काळात येणाऱ्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करून वीजग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- ए. पी. यादव, कार्यकारी अभियंता, महावितरण, वडूज विभाग.