'एआयसीटीई'ने फेटाळला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रस्ताव 

शीतलकुमार कांबळे
बुधवार, 12 एप्रिल 2017

पुनर्प्रस्ताव पाठविण्याची मुदत संपली; तंत्रशिक्षण संचालनालय घेईल पुढील निर्णय 
सोलापूर - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तंत्रनिकेतनतर्फे "एआयसीटीई'कडे (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्‍निकल एज्युकेशन) पाठविला होता. हा प्रस्ताव "एआयसीटीई'ने फेटाळला आहे. पुनर्प्रस्ताव पाठविण्याची मुदत मंगळवारी (ता. 11) संपली असून शासकीय तंत्रनिकेतनने या मुदतीपर्यंत प्रस्ताव पाठविला नाही. 

पुनर्प्रस्ताव पाठविण्याची मुदत संपली; तंत्रशिक्षण संचालनालय घेईल पुढील निर्णय 
सोलापूर - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तंत्रनिकेतनतर्फे "एआयसीटीई'कडे (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्‍निकल एज्युकेशन) पाठविला होता. हा प्रस्ताव "एआयसीटीई'ने फेटाळला आहे. पुनर्प्रस्ताव पाठविण्याची मुदत मंगळवारी (ता. 11) संपली असून शासकीय तंत्रनिकेतनने या मुदतीपर्यंत प्रस्ताव पाठविला नाही. 

ऑक्‍टोबर 2016 मध्ये महाराष्ट्रातील सहा शासकीय तंत्रनिकेतन बंद करून त्याजागी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता. यात सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचाही समावेश होता. शासनाच्या आदेशावरून शासकीय तंत्रनिकेतनने "एआयसीटीई'कडे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. "एआयसीटीई'ने प्रस्तावाबाबत चार त्रुटी काढल्या असून अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रस्ताव फेटाळला. 

सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासोबतच तंत्रनिकेतनही राहावे, या मागणीसाठी आंदोलने करण्यात येत आहेत. यापूर्वी सोलापूरला मिळालेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथे स्थलांतरित करून सोलापूरवर अन्याय करण्यात आला होता. आतासुद्धा या अन्यायाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. या विरोधात विविध सामाजिक संघटनांचा समावेश असलेली शासकीय तंत्रनिकेतन बचाव समिती लढा देत आहे. या पार्श्‍वभूमीवर "एआयसीटीई'ने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रस्ताव फेटाळल्याचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रस्ताव फेटाळण्याची कारणे 
अभियांत्रिकी महाविद्यालय फेटाळण्याची चार प्रमुख कारणे "एआयसीटीई'ने सांगितली आहेत. -महाविद्यालय कोणत्या संस्थेचे आहे, याची माहिती पुराव्यासह सादर केली नाही. 
-तंत्रनिकेतनच जागा कोणाच्या नावाने आहे, याचा पुरावा सादर केला नाही. 
-अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी गरजेचा असलेला अकृषी परवाना सादर केला नाही. 
- तंत्रनिकेतनची जागा कशासाठी वापरतो याबाबतचा महापालिकेचा परवाना सादर केला नाही. 

शासकीय तंत्रनिकेतन सुरू करत असताना तंत्रनिकेतनची जागा ही महापालिकेच्या हद्दीबाहेर असल्याने त्या वेळी या कागदपत्रे व परवान्यांची गरज नव्हती. मात्र आता तंत्रनिकेतनची जागा ही शहराच्या हद्दीत आल्याने वरील पुरावा व कागदपत्रांची मागणी "एआयसीटीई'ने केली होती. 

प्रा. दत्तात्रय कटारे : शासनाच्या आदेशाप्रमाणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव आम्ही "एआयसीटीई'कडे पाठविला होता. तो त्यांनी फेटाळला आहे. पुनर्प्रस्ताव पाठविण्याची मुदत मंगळवारी संपली असून आम्ही पुनर्प्रस्ताव पाठविलेला नाही. याबाबतचा पुढील निर्णय तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक घेतील. 
- प्रा. दत्तात्रय कटारे, प्रभारी प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर