शासकीय जमिनी, गायरान धनदांडग्यांच्या घशात...

शासकीय जमिनी, गायरान धनदांडग्यांच्या घशात...

कोल्हापूर - सर्कल, तलाठ्यांच्या करामतीमुळे जिल्ह्यातील पडक्‍या, गायरान किंवा ग्रामपंचायतींच्या जागा धनदांडग्यांच्या घशात जात आहेत. असे प्रकार उजेडात आल्यानंतर दस्त रद्द करून प्रकरण मिटविले जाते. दस्त रद्द झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने काही सर्कल आणि तलाठ्यांनी अशा प्रकरणांत स्वत:ची चांदी करून घेतली आहे. अशा प्रकारे प्रशासनाचा वचक राहिला नाही  तर मात्र जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या जागा आणि गायरान जमिनी शिल्लक राहणार नाहीत, अशी परिस्थिती आहे.  

पाचगाव (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीच्या जमिनीवर डल्ला मारल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे झाल्याने या प्रकरणाला आता तोंड फुटले आहे. करवीर तालुक्‍यातील कळंबा, पाचगावसह शहराशेजारी दहा किलोमीटरवरील अनेक गावांत हे प्रकार घडत आहेत.  

करवीर तालुक्‍यातही एका सर्कलने असेच ‘काळे’ धंदे केले होते. केवळ बदली करूनच हे प्रकरण मिटविण्यात आले. त्यामुळे महसूलच्याच अधिकाऱ्यांना प्रशासनाचा धाक राहिलेला नाही. आपल्या पदाचा गैरवापर करत आणि प्रकरण उजेडात आल्यानंतर ‘बघू’ म्हणण्याच्या सवयीमुळे ते स्वत:ची चांदी करून घेत असून, हे अधिकारी सध्या कायदा मोडून शासकीय जमिनी धनदांडग्यांच्या घशात घालण्याचे धाडस करत आहेत. शहराशेजारी असणारी, तसेच जी गावे हद्दवाढीमध्ये प्रस्तावित होती, अशा गावांमधील गायराने शोधूनही सापडत नाहीत. 

यावर एक तर अतिक्रमण झाले आहे किंवा शहरात राहून ‘फार्म हाऊस’ची इच्छा पूर्ण करणाऱ्या लोकप्रतिनिधीने ती जमीन घेतलेली दिसते. अनेक वेळा ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीमध्ये तक्रार केली जाते; पण या तक्रारीची कोणतीही दखल घेतली जात नाही. प्रसंगी सरपंचांसह काही सदस्यही यामध्ये सामील असल्याचा संशय घेतला जातो. परंतु, चौकशीअभावी सर्व काही अलबेल सुरू राहिले आहे. 

ग्रामपंचायतींच्या जागा बळकावल्या जात आहेत. ‘तू घेतली असशील तर मलाही त्यातील जागा वाटून हवी’ असे म्हणून अक्षरश: या जागा खिरापतीसारख्या वाटून घेतल्या आहेत. यासाठी ज्या-त्या ठिकाणच्या सर्कल आणि तलाठ्यांकडूनही मार्गदर्शन घेतले जात आहे. 

पाचगावमधील प्रकरण हे एक उदाहरण आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यातील गावांत अशीच परिस्थिती आहे. याची चौकशी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. 

गैरव्यवहाराचे स्वरूप
 गैरप्रकार उघड झाल्यास दस्त रद्द करून प्रकरण मिटविले जाते
 ग्रामपंचायतींच्या जागा, गायरान जमिनींवर डल्ला
 कोल्‍हापूर शहरा शेजारील हद्दवाढीत प्रस्तावित गावांमधील गायरानांचा महसूलकडून बाजार
 पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या संगनमताने जागांचा व्यवहार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com