लठ्ठपणाच्या समस्येवर शासन करणार जागृती 

fat
fat

कोल्हापूर - शरीराने जाड, गरगरीत माणूस म्हणजे खाऊन पिऊन टमटमीत, फारशी चिंता नसलेला, असं मानायची एक पद्धत होती. बऱ्याच अंशी हे खरेही होते. पण आता जाडजूड, गरगरीत माणूसच आरोग्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरला आहे आणि एखाद्या साथीच्या किंवा संसर्गजन्य रोगाबद्दल जशी जागरूकता केली जाते, तशी जागरूकता लठ्ठपणाबद्दल करण्याची वेळ राज्याच्या आरोग्य विभागावर आली आहे. किंबहुना लठ्ठपणा टाळा हा संदेश पुढचे वर्षभर लोकांच्या कानावर पडत राहणार आहे. 

साधारणपणे भरपूर खाणारा-पिणारा आणि शरीराची फारशी हालचाल न करता पडून राहणारा माणूस लठ्ठ होतो, हे एक कारण आहे. वयाच्या साधारण पन्नाशीनंतर लठ्ठपणा शरीराला कळत-नकळत येऊन भिडतो. पण अलीकडच्या काळात अगदी शाळकरी मुले-मुली, तरुण-तरुणी, मध्यमवर्गीय महिला-पुरुष हेदेखील लठ्ठपणाचे शिकार होत चालल्याचे लक्षण गंभीर मानले जात आहे. या लठ्ठपणातून हृदयविकार, मधुमेह, सांधेदुखी व पचनाचे विकार होणार हे स्पष्टच झाले असल्याने लठ्ठपणाबद्दल जागरूकता निर्माण केली जाणार आहे. लठ्ठपणा किंवा गरगरीत शरीर म्हणजे घरी भरपूर खाणे-पिणे, दूधदुभत्याची रेलचेल, असे न समजता असे शरीर म्हणजे धोक्‍याचा इशारा हे ठसवले जाणार आहे. 

लठ्ठपणा ही काही आज निर्माण झालेली व्याधी नाही. पण तुलनेने त्याचे प्रमाण कमी होते. अलीकडे मात्र बघता बघता पोट सुटणे, मानेवर वळ्या पडणे, गालावर सूज येणे, डोळ्याचा आकार बारीक होणे, दंड - मांड्या याचा आकार वाढणे ही लक्षणे दिसू लागली आहेत. चटपटीत खाणे-पिणे, व्यायामाचा अभाव, बैठे काम आणि घरातही 12 तास टीव्हीसमोर बसून राहणारे या लठ्ठपणाचे बळी ठरत आहेत. दुपारी झोपू नये हे आरोग्य तज्ज्ञांनी कितीही सांगितले तरी दुपारी तीन ते चार तास डाराडूर झोपणाऱ्यांनाही लठ्ठपणाने येऊन बघता बघता घेरले आहे. एकदा लठ्ठपणाने घेरले की उरल्या सुरल्या हालचालीही मंदावत असल्याने लठ्ठपणा कमी होण्याची शक्‍यता खूप कमी होत आहे. ज्याला लठ्ठपणा आहे, त्याला हृदयविकार, मधुमेह, सांधेदुखी यापैकी एक तर आजार ठरलेला आहे. केवळ लठ्ठ व्यक्तीच नव्हे; तर त्यांच्या कुटुंबालाही औषधपाणी, देखभालीचा त्रास आहे. 

या लठ्ठपणाची तीव्रता गेल्या काही वर्षांत वाढते आहे. लठ्ठपणा हा काही आजार नाही. पण लठ्ठपणाबरोबर येणाऱ्या व्याधी खूप क्‍लेशदायक आहेत. विशेष हे की, लठ्ठपणा टाळणे पूर्णपणे आपल्या हातात आहे. त्यामुळेच शासनाने जनजागृतीची विशेष मोहीम हाती घेतली आहे. 

स्थूलपणाच्या बाबतीत जागतिक स्तरावर आपला देश दिसऱ्या स्थानावर येऊन पोचला आहे. स्थूलपणा ही निश्‍चित आरोग्याची गंभीर समस्या आहे. अनेक विकाराचे कारण स्थूलपणा असल्याने त्याची जागृती व निर्मूलन आवश्‍यक झाले आहे. 
- डॉ. आर. टी. बोरसे, शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकशास्त्र प्रमुख 

लठ्ठपणा कमी करण्यावर रामबाण औषध नाही. पण लठ्ठपणा कमी करण्याचा उपाय आपल्याच हातात आहे. योग्य आहार, व्यायाम, नियमित शारीरिक हालचाली व खाण्यावर नियंत्रण आणले तर बऱ्यापैकी लठ्ठपणा कमी होतो. पण त्यात नियमितता पाहिजे. 
- डॉ. दिनेश चव्हाण 
वजन वाढल्यावर व्यायामाला सुरवात करणारे अनेक लोक आहेत. पण वजनच प्रमाणापेक्षा जास्त वाढू न दिल्यास आपण अनेक शारीरिक व्याधींना निश्‍चित टाळू शकतो. त्यामुळे लठ्ठपणा वाढू नये म्हणून शालेय पातळीवरच जागरूकता महत्त्वाची आहे. वजन जास्त वाढल्यावर ते कमी करणे खूप त्रासदायक असते. पण वजन वाढू न देणे हे आपल्या हातात असते. 
- डॉ. साईप्रसाद 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com