अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीचे मुख्यमंत्र्याना निवेदन

सुनील अकोलकर
गुरुवार, 5 एप्रिल 2018

तिसगाव (नगर) : तिसगावमधील जुगार, मटका, अवैध दारू विक्री तसेच चक्री आदी अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने आक्रमक भूमिका घेतली असून  थेट मुख्यमंत्र्याना निवेदन पाठवून अवैध धंदे बंद करण्यासाठी साकडे घातले आहे.

तिसगाव (नगर) : तिसगावमधील जुगार, मटका, अवैध दारू विक्री तसेच चक्री आदी अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने आक्रमक भूमिका घेतली असून  थेट मुख्यमंत्र्याना निवेदन पाठवून अवैध धंदे बंद करण्यासाठी साकडे घातले आहे.

तिसगाव हे आसपासच्या तीस चाळीस गावांचे मध्यवर्ती ठिकाण असलेले गाव आहे. बाजारपेठेचे गाव असलेल्या या गावात अलीकडील काळात अवैध धंद्यानी जोर धरला आहे. येथील वृद्धेश्वर हायस्कुल चौक, बसस्थानक आदी गर्दीच्या ठिकाणीही राजरोस पणे हे व्यवसाय चालू असल्याने सर्वसामान्य लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ऑनलाईन जुगारीचे (चक्री) अड्डे मुख्य रस्त्यावर बिनधास्त पणे चालू आहेत. याला बिंगो या नावानेही ओळखले जाते. या ऑनलाईन मटक्याकडे तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात गुरफटला जात आहे.

शाळकरी मुलेही याकडे आकर्षित होवू लागल्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. चक्रीमुळे तरुण वर्ग कर्जबाजारी तसेच व्यसनाधीन बनत चालल्याने ग्रामस्थामध्ये प्रचंड चीड दिसून येत आहे. पोलीस खात्याचा या व्यावसायिकांवर धाक राहिला नसल्याचे दिसते. गावातील महिलावर्गातून अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली जात होती. सरपंच काशिनाथ लवांडे यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या ग्रामपंचायतीच्या बैठकीत अवैध धंदे बंद करण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला आहे. तसेच अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीच्या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री , पालकमंत्री , जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदींना पाठविण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे ग्रामस्थामधून स्वागत केले जात आहे.

गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता पोलीस खात्याने कडक कारवाई करून अवैध व्यवसायाला आळा घालावा अन्यथा गाव  बंद ठेवून तीव्र आंदोलन हाती घेतले जाईल, असे तिसगावचे सरपंच  काशिनाथ लवांडे यांनी सांगितले. 
 

Web Title: grampanchayat appeal to chief minister to ban illegal business by