स्वतंत्र प्रस्तावामुळे भाजपमधील गटबाजी पुन्हा उघड 

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 19 एप्रिल 2018

सोलापूर - समांतर जलवाहिनीसाठीची योजना मंजूर करण्यात सहयोग दिल्याबद्दल संबंधित मंत्री व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्याचे प्रस्ताव देण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांत चढाओढ लागली आहे. स्वतंत्र प्रस्ताव देताना सहकारमंत्री गटाने योजनेचे श्रेय महापौरांना देतानाच, दोन्ही मंत्र्यांचा उल्लेख टाळला आहे. तर पालकमंत्री गटाने स्थानिक दोन्ही मंत्र्यांसह मुख्यमंत्री व जलसंपदामंत्र्यांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे भाजपमधील गटबाजी पुन्हा उघड झाली आहे. 

सहकारमंत्री सुभाष देशमुख गटाचे नगरसेवक नागेश वल्याळ, श्रीनिवास करली, संतोष भोसले व सुभाष शेजवाल यांनी दिलेल्या प्रस्तावात महापौर शोभा बनशेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यासाठी सर्वात प्रथम विद्यमान उपराष्ट्रपती तथा तत्कालीन केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे प्रयत्न केले. ही योजना तयार करणारे आयुक्त आणि शासनाचे अव सचिव श्री. बिराजदार यांनी विशेष मदत केल्याबद्दल या सर्वांचे अभिनंदन करण्यात येत आहे, असे नमूद केले आहे. या प्रस्तावात महापौरांना श्रेय देण्यात आले आहे. 

पालकमंत्री विजय देशमुख यांच्या गटातील नगरसेवक अविनाश पाटील, प्रतिभा मुदगल, सुरेखा काकडे व सोनाली मुटकिरी यांनी मात्र ही योजना आणण्यासाठी पालकमंत्री व सहकारमंत्र्यांनी अतिशय परिश्रम घेतले. योजना मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांचे ही सभा अभिनंदन करीत आहेत. तसेच योजनेच्या यशस्वितेसाठी महापौर व आयुक्तांनी व इतर ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष योगदान दिले आहे त्या सर्वांचेच अभिनंदन करण्यात येत असल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. 

...तर दिसले असते भाजपमधील ऐक्‍य 
समांतर जलवाहिनीचे श्रेय महापौरांना देणारा प्रस्ताव दाखल झाला आहे आणि त्यामध्ये पालकमंत्री व सहकारमंत्र्यांचा उल्लेख नाही हे समजल्यावर पालकमंत्री गटातील नगरसेवकांनी तातडीने दुसरा प्रस्ताव दाखल केला. सहकारमंत्री गटाच्या नगरसेवकांनी दिलेल्या प्रस्तावात दोन्ही मंत्र्यांचा उल्लेख नाही. याबाबत पालकमंत्री गटाचे नगरसेवक वरचढ ठरले. एकीकडे भाजपमध्ये ऐक्‍य झाल्याची चर्चा सुरु असताना, स्वतंत्र प्रस्तावामुळे अंतर्गत खदखद सुरु असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. दोन्ही गटाच्या नगरसेवकांनी एकच प्रस्ताव दिला असता तर तो भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांसाठी दुग्धशर्करा योग ठरला असता.

Web Title: grouping of the BJP Reveal again