गुटखा, मटका, दारुविक्री जोमात, संसार उध्वस्त, पोलिसांचा कानाडोळा

गुटखा, मटका, दारुविक्री जोमात, संसार उध्वस्त, पोलिसांचा कानाडोळा

मायणी - जीवघेणा गुटखा व आयुष्यच उध्वस्त करणारा मटका यासह जुगार, दारूविक्री, दुध भेसळ, यासह अनेक बेकायदा धंद्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे. सर्वसामान्य लोकांचे संसार उध्वस्त कऱणाऱ्या त्या काळ्या धंद्याकडे राजकीय दबावामुळे पोलिसही कानाडोळा करीत आहेत. त्यांनी धाडसाने सर्वच काळ्या धंद्यांची पालेमुळे उखडुन टाकावीत. अशी मागणी नागरिक करीत आहे.  

त्याबाबतची माहिती अशी, मायणीसह परिसरात ठिकठिकाणी मटक्याचे एजंट आहेत. त्यांनी या भागातील गावोगावी मटका बुकींगसाठी जाळे पसरले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करीत मटका घेतला जात आहे. दुष्काळी स्थिती व बेरोजगारी यामुळे मायणी, कलेढोण, कातरखटाव, चितळी आदी मोठ्या गावांतील तरुण मोठ्या संख्येने अवैध धंद्याकडे वळत आहेत. कमीत कमी भांडवलात अल्पावधीत अधिकाधिक पैसे मिळविण्याकडे त्यांचा अोढा वाढत आहे. परिणामी गुटखा विक्री, मटका, जुगार, दुधभेसळ, बेकायदा दारुविक्री, वाळू तस्करी अशा अनेक काळ्या धंद्यात तरुण गुरफटले आहेत. दररोज हजारों रुपयांचा मटका खेळुन काहींजण आयुष्यातुन उठले आहेत. तर काहीजण कर्ज काढुन मटका खेळत आहेत. काहींनी आत्मत्या करुन जीवनयात्रा संपवली आहे. खेड्यापाड्यातुन अनेकजण कामाला जातो म्हणुन सांगुन येथे दिवसभर मटका खेळत असतात. त्यांचे संसार उध्वस्त होऊ लागलेत. परिणामी त्रस्त कुटुंबिय पोलिसांवर तोंडसुख घेत आहेत. काळ्या धंद्यांची पोलिसांना माहिती आहे. मात्र राजकीय दबावामुळे कारवाई करण्यास ते धजावत नसल्याचे चित्र आहे. मोठ्या माशांना वाचवण्यासाठी मग किरकोळ लहान माशांवर तोंडदेखली कारवाई करुन नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम पोलिस करीत आहेत. सहायक पोलिस उपनिरीक्षक संतोष गोसावी यांनी येथे हजर होताच दारूबंदीसह विविध काळ्या धंद्यावर कारवाईची मोहीम हाती घेतली होती. मात्र आठवड्यातच त्यांना मोहीम गुंडाळावी लागली. त्यामुळे सुरवातीला सिंघमची उपमा देणारे लोकच आता त्यांच्या कर्तुत्वावर नाराजी व्यक्त करीत आहेत. कार्यपद्धतीवर टीका टिपण्णी करीत आहेत. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे, कारवाईचा फार्स करण्याने दिवसेंदिवस काळ्या धंद्यात वाढच होत आहे.

दरम्यान, आरोग्यास घातक असलेल्या गुटख्यावर तर शासनाने बंदी घातली असतानाही सर्रास गुटखा विकला जात आहे. मटका व गुटखा विक्रेते, एजंटना राजाश्रय असल्याने बिनदिक्कत कोणालाही न जुमानता ते धंदा करीत आहेत. मटका व गुटख्याचा धंदा येथे जोमात सुरू असुन बेकायदा दारू विक्रीतही वाढ झाली आहे. परिसरातील गावोगावचे लोक येथील विविध हाॅटेल, ढाब्यांवर मद्यपानासाठी येत आहेत. परिणामी काळ्या धंद्यात दररोज लाखोंची कमाई होत आहे. त्या पैशांचा गैरवापर होऊन सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. पोलीसांनी मायणीसह परिसरातील अशा सर्वच बेकायदा व्यवसाय, काळ्या धंद्यांची पालेमुळे खणुन काढावीत. करडी नजर ठेवुन कायद्याचा धाक निर्माण करावा. लोकांचे उध्वस्त होणार संसार वाचवावेत अशी आर्त मागणी नागरिक करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com