भिलारमधील पुस्तकांना राजकारणाचा वास... 

भिलारमधील पुस्तकांना राजकारणाचा वास... 

भिलार - महाराष्ट्रातील वाचनसंस्कृतीला बळ देण्यासाठी पुस्तकांचे गाव भिलार सज्ज झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आदी प्रमुखांच्या उपस्थितीत उद्या (गुरुवारी) या उपक्रमाचे उद्‌घाटन होत आहे. या गावातील 25 घरांमध्ये कथा, कादंबरी, कविता, ललित साहित्य, बाल साहित्य, स्त्री साहित्य, चरित्रे, आत्मचरित्रे, संतसाहित्य, ऐतिहासिक अशा साहित्यातील सर्व प्रकारच्या पुस्तकांचे रॅक सजावटीसह सजले आहेत. देशातील या पहिल्याच आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे स्वागत सर्व स्तरांतून होत आहे. तरीही या पुस्तकांना आज राजकारणाचा वास लागल्याने उपक्रमाच्या यशस्वितेबद्दल अनेकांच्या मनांत किंतु निर्माण झाला आहे. 

पाचगणी-महाबळेश्‍वर रस्त्यावर पाचगणीपासून पाच किलोमीटरवर आतील बाजूस भिलार गाव आहे. निसर्गसौंदर्याचा अनोखा ठेवा आणि स्ट्रॉबेरीची गोडी यासाठी भिलार यापूर्वीच परिचित आहे. आता पुस्तकांचे गाव म्हणून ते जगासमोर येणार आहे. महामार्गापासून भिलारकडे जाणाऱ्या रस्त्यांवर ठिकठिकाणी "पुस्तकांचे गाव भिलार ... किलोमीटरवर' असे अंतराचे आकडे नसणारे बोर्ड दिसत होते. मुख्य रस्त्यापासून गावाकडे वळल्यावर रस्त्याच्या दुतर्फा भारतीय जनता पक्षाचे झेंडे लक्ष वेधून घेत होते. कार्यक्रम शासकीय असला, तरी जणू हा उपक्रम भाजपचाच असल्यासारखे वातावरण आजच तयार करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी चंग बांधल्याचे स्पष्ट झाले. मुळात महाबळेश्‍वर तालुक्‍यात भाजपची ताकद नगण्य आहे. बाहेरच्या कर्यकर्त्यांनी येऊन इथल्या राजकारणाला रंग देण्यासाठी अट्टाहास केल्याचे स्थानिकांनी सांगितले. पुस्तकांचे गाव करण्याच्या संकल्पनेला गावकऱ्यांनी चांगलाच पाठिंबा देऊन लोकसहभागातून या कामाला गती दिली. पक्ष किंवा सत्ता कोणाची आहे, याचा विचार न करता शासकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आवश्‍यक ती सर्व मदत केली. पुस्तकांच्या मांडणीसाठी स्वतःची घरे विनामूल्य दिली. आपल्या गावात वाचनसंस्कृतीला ताकद देण्याची संधी मिळते आहे, या भावनेतून सर्व प्रकारची मदत करण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली. मात्र, आता उद्‌घाटन जवळ येताच भाजपच्या कार्यकर्त्यांचा अतिउत्साह खटकू लागला आहे, असे एका कार्यकर्त्याने सांगितले. कार्यक्रमाचे ठिकाण ठरविण्यापासून ते मुख्यमंत्र्यांनी कोणत्या घराला भेट द्यायची, अशा छोट्याछोट्या गोष्टीतही त्यांचा हस्तक्षेप वाढल्याची तक्रार त्याने केली. या उपक्रमास सक्रिय सहकार्य करण्याची आणि वाचनसंस्कृतीला बळ देण्यासाठी ग्रामस्थांची तयारी आहे, मात्र, पुढील काळात या सांस्कृतिक उपक्रमातील राजकारण दूर झाले नाही, तर अडचणी येण्याची शक्‍यता एकाने बोलून दाखविली. 

या प्रकल्पाच्या उद्‌घाटनासाठी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, खासदार उदयनराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, सभापती रूपाली राजपुरे आदी मान्यवर येत आहेत. त्यामुळे पाचगणीपासून भिलारपर्यंत आज शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाची चागलीच तारांबळ उडाली होती. पुस्तकांचे गाव सज्ज झाले आहे. मात्र, रस्ते व इतर सुविधांच्या सज्जतेसाठी महसूल व पोलिसांच्या वाहनांची वर्दळ वाढली होती. रस्त्यावरील वाहतुकीच्या अडचणी दूर करणे, विजेच्या तारांचा धोका दूर करणे अशी कामे सुरू होती. गावात शिरल्यापासून स्ट्रॉबेरीच्या चित्रांसोबत पुस्तके दिमाखाने मिरवू लागली होती. घराघरांवर गाजलेल्या साहित्यकृतींची नावे झळकत होती. कोणत्या घरात कोणत्या प्रकारची पुस्तके आहेत, हे सांगणारे फलकही लक्ष वेधून घेत होते. घरात गेल्यावर आकर्षक रॅकवर व कपाटांमधून विराजमान झालेली पुस्तके वाचण्यापूर्वीच वेगळा आनंद देत होती. घरातील माणसे येणाऱ्यांचे स्वागत करून पुस्तकांची माहिती देत होते. गावातील खासगी घरे व सार्वजनिक ठिकाणे अशा 25 ठिकाणी या पुस्तकांचा गंध दरवळला आहे. महाबळेश्‍वर, पाचगणीला येणाऱ्या पर्यटकांसाठी वाचन संस्कृतीची ओळख करून देणारा हा आगळा प्रकल्प आकर्षण ठरणार आहे. निसर्गरम्य परिसरात वाचनाचा आनंद घेण्याबरोबरच साहित्यिकांच्या कार्यक्रमांची अधूनमधून मेजवानीही देणार आहे. गावात पर्यटकांच्या निवास, भोजनाची व्यवस्थाही आहे. त्यामुळे रसिकांना येथे राहून वाचनाचा आनंद लुटता येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com