तासगाव, कवठेमहांकाळ खानापूरमध्ये गारपीट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

वळवाने बळिराजा सुखावला : सावळजमध्ये वीज पडून दोन शेळ्या जखमी
सांगली - गेल्या काही दिवसांत तापमानामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी, ग्रामस्थांना आज वळवाच्या अचानक हजेरीने दिलासा दिला.

वळवाने बळिराजा सुखावला : सावळजमध्ये वीज पडून दोन शेळ्या जखमी
सांगली - गेल्या काही दिवसांत तापमानामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी, ग्रामस्थांना आज वळवाच्या अचानक हजेरीने दिलासा दिला.

सकाळपासूनच सुरू झालेल्या उकाड्याने अवकाळीच्या आगमनाची चाहूल दिली होती. दुपारच्या सुमारास तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर या दुष्काळी तालुक्‍यांमध्ये वादळी वाऱ्यांसह झालेल्या गारपिटीने चांगलीच हजेरी लावली. सांगली, मिरजेत सायंकाळच्या सुमारास ढग दाटून आले होते; मात्र पावसाने हुलकावणी दिली. सावळजमध्ये वीज पडून दोन शेळ्या जखमी झाल्या.

दोन दिवसांत पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली होती. शनिवारपासून सोमवारपर्यंत वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्याला आजच्या पावसाने प्रारंभ झाला.

तासगाव ः तालुक्‍यात आज ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने एकच दैना उडाली. प्रचंड उकाड्यानंतर आलेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला. सावळज परिसरात गारपीट झाली. तीन-चार दिवस प्रचंड उष्याने हैराण झालेल्या तासगावकरांना दुपारी तीनच्या सुमारास अचानक प्रचंड वादळी वारे आणि झालेल्या हलक्‍या पावसाने दिलासा मिळाला. जोरदार वाऱ्यामुळे झाडे तुटून रस्त्यावर पडणे यासारखे प्रकार घडले. शहरातील जनजीवन अचानक आलेल्या पावसामुळे विस्कळित झाले होते. तब्बल अर्धा ते पाऊण तास जोरदार वारे आणि पावसाने हजेरी लावली. सायंकाळी उशिरापर्यंत ढगाळ वातावरण होते.

सावळज ः सावळजसह पूर्व भागातील अंजनी, वडगाव, सिद्धेवाडी, दहिवाडी, जरंडी, डोंगरसोनी भागात दुपारी अडीच वाजता गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सावळज, वडगाव, सिद्धेवाडीमध्ये मोठी गारपीट झाली आहे.

शिरढोण : कवठेमहांकाळच्या पश्‍चिम भागात गारांसह किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडला. गडगडाटी आवाजाने पावसासह मोठ्या प्रमाणात गारा पडल्या. सुमारे अर्धा तास लांडगेवाडी, शिरढोण, जायगव्हाण, कुचीमध्ये रिमझिम सुरू होती. अद्याप दहा टक्के द्राक्ष बागा पडून आहेत. शेवटच्या टप्प्यात द्राक्षाला चांगला दर येईल, या आशेपोटी छाटणी उशिरा घेतात; परंतु याचा फटका मात्र मोठ्या प्रमाणात बसला आहे.