कर्णबधीर प्रसून सर्वसामान्य विद्यार्थ्यांत ७२ टक्क्यांनी यशस्वी !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

सुमारे तेरा वर्षांपूर्वी मूकबधीर शाळेच्या शिक्षकांची ऑफर डावलून परिस्थितीवर मात करत आई वडिलांच्या मार्गदर्शनाने बोलायला शिकलेल्या आणि ज्याच्यामुळे महाराष्ट्रातील कर्णबधीर बालकांच्यासाठी एक नवीन योजना तयार होऊ शकली तो प्रसून भांगे यंदाच्या बारावी परीक्षेत ७२ टक्के गुण मिळवू उत्तीर्ण झाला आहे.

शेटफळ (सोलापूर) - प्रसून कर्णबधीर आहे ,मुका आहे. हा नॉर्मल शाळेत शिकूच शकणार नाही. याला आमच्या मूकबधीर शाळेत घाला. आमच्याकडे सगळी व्यवस्था आहे. सुमारे तेरा वर्षांपूर्वी मूकबधीर शाळेच्या शिक्षकांची ही ऑफर डावलून परिस्थितीवर मात करत आई वडिलांच्या मार्गदर्शनाने बोलायला शिकलेल्या आणि ज्याच्यामुळे महाराष्ट्रातील कर्णबधीर बालकांच्यासाठी एक नवीन योजना तयार होऊ शकली तो प्रसून भांगे यंदाच्या बारावी परीक्षेत ७२ टक्के गुण मिळवू उत्तीर्ण झाला आहे.

शेटफळ (ता.मोहोळ जिल्हा सोलापूर) येथील जयप्रदा व योगेश भांगे यांचा हा मुलगा आहे. कर्णबधीर बालकांसाठी प्रसूनच्या आजारावर मात करत त्याच्या पालकांनी त्यास बोलायला शिकवले व पुढे खेड्यातल्या इतर कर्णबधीर बालकांना बोलायला शिकवण्यासाठी 'व्हाईस ऑफ व्हाईसलेस अभियान' ही संस्था उभारली गेली. या संस्थेने कर्णबधीरांबाबत केलेले संशोधन महत्त्वाचे ठरले. या संस्थेच्या प्रयत्नाने महाराष्ट्रातील कर्णबधीर बालकांसाठी 'ताटवाटी चाचणी' सारखा उपक्रम व 'होय,कर्णबधीर बालके बोलू शकतात' ही योजना सुरु झाली. 

'प्रिसिजन' कंपनीच्या सहाय्याने उभारला जात असलेल्या या संस्थेचा 'बालेवाडी' प्रकल्पही सर्वश्रुत आहे. या सगळ्या बाबी ज्याच्यामुळे घडल्या तो प्रसून हा शेटफळ येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कला शाखेत शिकत होता. कर्णबधीर असूनही तो सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत ५ व्या गुणानुक्रमाणे उत्तीर्ण झाला आहे. प्रसून यास प्राचार्य आर. बी. शिंदे वर्गशिक्षक दत्तात्रय भोसले, सिद्धेश्वर सरवदे, रवींद्र व्यवहारे, ज्ञानेश्वर व्यवहारे, लतिका काटे यांचे मार्गदर्शन मिळाले. 

आता मुक्या बालकांना बोलण्यासाठीच काम करणार आहे. तसेच, पदवीनंतर एम.एस.डब्ल्यू. करणार आणि भारतातील कर्णबधीर आणि मुक्या बालकांना बोलायला शिकण्यासाठी काम करणार आहे. विशेष म्हणजे मुक्या मुलांसाठी बधीर आणि मूक शाळा हा एकच पर्याय पालकांसमोर असतो. पण कर्णबधीर बालकांच्या पालकांनी हतबल न होता आपल्या पाल्याला बोलायला शिकवले पाहिजे. देशात बोलती बालके घडवणारी शासकीय व्यवस्था आपण नक्की निर्माण करू शकतो. असे प्रसून याने यावेळी सांगितले आहे.

Web Title: handicapped get 72 percent in 12th exam