साताऱ्यात ‘हापूस’ने ओलांडली ‘पायरी’!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

सातारा - हवामानातील बदल, तापमानातील मोठ्या प्रमाणावरील चढउताराचा फटका आंब्याला बसला आहे. परिणामी येथील बाजारात आंब्याची आवक धिमी असून, कमी आवकीमुळे आंब्याचे दर मात्र तेजीत आहेत. येथील बाजार समितीमध्ये आज अक्षयतृतीयेच्या पार्श्‍वभूमीवर 
तीन हजार पेट्यांची आवक होती. आज केवळ २५० बॉक्‍स आल्यामुळे प्रतवारीनुसार ७०० ते १३०० रुपयांपर्यंत हापूसच्या एक व दीड डझनाच्या पेटीचा दर होता. 

अक्षयतृतीयेला आंब्याला मागणी अधिक असते. त्यामुळे गेल्या दोन- तीन दिवसांत सुमारे ४०० रुपयांनी आंब्याचा दर कडाडला असल्याचे आंबा व्यापाऱ्यांनी सांगितले. येत्या काळात हे दर सर्वसामान्य ग्राहकाच्या आवाक्‍यात येतील, असा अंदाजही व्यापारी वर्गाने व्यक्त केला. अक्षयतृतीया व त्यानंतर आंब्याची बाजारपेठ वाढण्यास सुरवात होते. यंदा मात्र आंब्याची आवक तुलनेने कमी राहिली आहे. उत्पादनातील घट हे त्याचे प्रमुख कारण आहे. प्रतिकूल वातावरणाच्या गर्तेतून गेलेल्या हापूसचे बाजारात सध्या दर वधारलेलेच आहेत. आज हापूस ६०० ते ११०० रुपये डझनाने विकला जात आहे. बाजारात पायरी आंब्याचाही पुरवठा तुटपुंजा आहे. ४०० ते ५०० डझनापर्यंत पायरी आंब्याचे दर आहेत. 

यंदा हापूसला अवकाळी पावसाचा वेळोवेळी फटका बसला. थंडीही उशिराने सुरू झाली. हापूसची आवक एप्रिल महिन्यामध्ये बऱ्यापैकी सुरू झाली असली, तरी ती मागणीच्या मानाने समाधानकारक नाही. कोकणातील माल मुंबई व कोल्हापूरमार्गे साताऱ्यातील व्यापारी आणतात. यंदाच्या मोसमात मार्चमध्ये हापूसचा दर हजार ते १४०० रुपये डझन होता. तर एक एप्रिल रोजी हा दर ८५० रुपयांपर्यंत खाली आला होता. गेल्या आठवड्यात तो ५०० ते ६०० रुपये डझन होता. तथापि, गेल्या दोन- तीन दिवसांत हापूसचा दर पुन्हा कडाडला आहे. फळाची आवक याच पद्धतीने तुटपुंजी राहिल्यास हापूसचे दर कडाडलेलेच राहतील. हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात येण्यासाठी मे महिन्याची वाट पाहावी लागण्याची दाट शक्‍यता विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे.

‘‘यंदा हापूसची बऱ्यापैकी आवक घटली आहे. दोन- तीन दिवसांपासून बाजारपेठेत दरही वधारले आहेत. कमी आवकीमुळे बाजारपेठेवर थेट परिणाम दिसून यायला लागला आहे. येत्या काळात आवक वाढल्यानंतर दर आवाक्‍यात येतील.’’ 
- फारुख बागवान, हापूस विक्रेता

Web Title: hapus payari mango rate