राफेल विमान खरेदी सर्वांत मोठा घोटाळा - हर्षवर्धन पाटील

राफेल विमान खरेदी सर्वांत मोठा घोटाळा - हर्षवर्धन पाटील

कोल्हापूर - राफेल विमान खरेदीचा घोटाळा ६० वर्षांतील देशातील सर्वांत मोठा भ्रष्टाचार आहे. हा मलिदा कुणाच्या खिशात गेला, देशाचा रखवालदार हा भागीदार कधी झाला, अशा शब्दांत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर तोफ डागली. काँग्रेस समितीत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी भाजप सरकारविरोधात निदर्शने केली.

श्री. पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. तीच माहिती त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधतानाही दिली. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, महापौर शोभा बोंद्रे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, प्रकाश सातपुते, हिंदुराव चौगले, बाळासाहेब सरनाईक, संध्या घोटणे आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, ‘ना खाऊंगा, ना खाने दुँगा’ असे सांगणारे या घोटाळ्यावर चकार शब्दही बोलत नाहीत. मित्र सोडून निघाले आहेत. ‘आज इकडे- उद्या तिकडे’ असलेल्या सेनेनेही राफेलसंबंधी स्पष्टीकरण मागितले आहे.

‘मन की बात’मध्ये यासंबंधी पंतप्रधान बोलायला तयार नाहीत. सामान्य माणसाच्या खिशातील पैसे अशा गैरव्यवहारांसाठी वापरले जाणार असतील, तर कधी सहन केले जाणार नाही. तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना व्यवहार पूर्ण झाल्यानंतर गोव्याला पाठविण्यात आले. बहुमत नसताना ओढूनताणून सरकार आणले गेले. अनिल अंबानी यांच्या ज्या कंपनीचा जन्म अवघ्या बारा दिवसांपूर्वी झाला, त्या कंपनीला ३० हजार कोटींचे देखभाल दुरुस्तीचे काम दिले गेले. 

विमान खरेदीत तफावत
काँग्रेसच्या काळात १२६ विमाने खरेदीचा प्रस्ताव होता. एका विमानाची किंमत ५२६ कोटी होती. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर मूळ करारात बदल झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सला गेले. त्यांनी पहिला करार रद्द केला. ३६ विमाने ६० हजार १४५ कोटींना खरेदी करार झाला. काँग्रेसने जे विमान ५२६ कोटींना खरेदीचा प्रस्ताव होता, तेच भाजपने एक हजार ६७० कोटी ७० लाखांना खरेदी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com