दुध उत्पादकाला लिटरमागे आणखी १० रुपये जादा देणे शक्‍य - मुश्रीफ

दुध उत्पादकाला लिटरमागे आणखी १० रुपये जादा देणे शक्‍य - मुश्रीफ

कोल्हापूर - ‘गोकुळमध्ये अमूलप्रमाणे पारदर्शकता आणण्याची भाषा केली जात आहे. तत्पूर्वी संघाच्या स्कॉर्पिओ, टॅंकर लॉबी, त्याचे भाडे यावरही कारभाऱ्यांनी चर्चा करावी. आज म्हशीचे दूध व मुंबई मार्केट यामुळेच दुधाला दर मिळत आहे. यात संचालक मंडळाचे कर्तृत्व नाही. संघाच्या गळ्यात लोढण्यासारखी संचालक मंडळाची अवस्था झाली आहे. या संचालकांऐवजी चांगला कारभार करणारी व्यवस्था असती तर उत्पादकाला लिटरमागे आणखी १० रुपये जादा देणे शक्‍य आहे’, असा दावा आमदार हसन मुश्रीफ यांनी केला.

कॉफी वुईथ ‘सकाळ’ या उपक्रमात त्यांनी संवाद साधला.
आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘जिल्हा बॅंकेची सत्ता आमच्याकडे आहे. अडचणीत असताना बॅंकेची सूत्रे आली. बॅंकेला अडचणीतून बाहेर आणण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले. कोणताही वायफळ खर्च होणार नाही, याची दक्षता घेतली. संचालकांना वाहन दिलेले नाही. तसेच मीटिंगचा भत्ताही  देत नाही. चहा-नाश्‍ता यासाठीही बॅंकेचा खर्च होत नाही. संचालक पदरच्या पैशाने चहापान करतात. या सर्व उपाययोजनांमुळेच बॅंक सुस्थितीत आहे. हे आम्ही करून दाखवले म्हणून सांगत असल्याचेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.  

ते  म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीत जीव ओतून धनंजय महाडिक यांचा प्रचार केला. महाडिक यांना खासदार करण्यासाठी मी माझे मंत्रीपद पणाला लावले. आमदार सतेज पाटील यांच्याकडे जाऊन महाडिक-पाटील यांच्यात समेट घडवून आणला. सतेज पाटील यांनीही मनापासून महाडिक यांचा प्रचार केला, मात्र महाडिक यांनी विजयी झाल्यानंतर पाटील यांनी आपला प्रचार केला नसल्याचे सांगितले, हा भाग वेगळा; मात्र महाडिक यांना निवडून आणण्याचा मी शब्द पाळला आहे.’’ 

महाडिकांचा वारू रोखला
लोकसभा, विधानसभेनंतर आलेल्या विधान परिषद निवडणुकीत मात्र मी सतेज पाटील यांच्या बाजूने होतो. निवडणुकीची यंत्रणा राबवली. सदस्यांना घेऊन पुण्याला गेलो. या निवडणुकीत सतेज पाटील यांनी महादेवराव महाडिक यांचा पराभव केला. महाडिकांच्या विजयाचा वारू आपण विधान परिषद निवडणुकीत रोखला. त्यामुळे वारू रोखणे, न रोखणे हा निवडणूक मैदानातील विषय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com