जिल्ह्यात उष्माघाताचा बळी 

जिल्ह्यात उष्माघाताचा बळी 

कोल्हापूर - ओढ्यावरील सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसरातील दुकानाच्या दारात रक्ताच्या थारोळ्यात फरशी कामगाराचा मृतदेह आढळला. अरविंद शामराव सुतार (वय 50, रा. शाहूपुरी कुंभार गल्ली) असे त्यांचे नाव आहे. प्रथमदर्शनी हा घातपाताचा प्रकार वाटला. मात्र उष्माघातामुळेच मेंदूत रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवल्यामुळे हा जिल्ह्यातील उष्माघाताचा पहिला बळी ठरला. याची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, शाहूपुरी पहिल्या गल्लीत अरविंद सुतार राहतात. ते फरशी पॉलिशचा व्यवसाय करतात. ते घरात आईसोबत राहत होते. दोन महिन्यांपूर्वी आईचे निधन झाल्यानंतर त्यांनी राहते घर विकले. सध्या ते ओढ्यावरील गणपती मंदिर परिसरातच एकटे राहत होते. शनिवारी रात्री ते शेळके पुलाजवळील शिल्पा कला दुकानासमोर झोपले होते. आज सकाळी ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. हा खुनाचा प्रकार असावा, अशी चर्चा परिसरात सुरू झाली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी याची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. घटनास्थळी शहर पोलिस उपाधीक्षक भारतकुमार राणे व शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी तातडीने भेट दिली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता सुतार यांच्या मृतदेहावर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. मात्र त्यांच्या नाकातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठवला. त्यानंतर दुपारी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. उष्माघातामुळे सुतार यांचा रक्तदाब वाढून त्यामध्येच त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला असण्याची शक्‍यता शाहूपुरी पोलिसांनी वर्तवली. सुतार यांच्या मागे त्यांच्या भावजय आहेत. 

शवविच्छेदन अहवालात नमूद केलेली माहिती बाहेर देता येत नाही. त्याविषयी गोपनीयता बाळगली जाते. त्यामुळे अरविंद सुतार यांच्या मृत्यूच्या कारणांबाबत काही माहिती देऊ शकत नाही. 
- डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता सीपीआर 

खुनाचीच चर्चा 
ओढ्यावरील गणपती मंदिराजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. दगडाने ठेचून त्याचा खून केल्याची चर्चा सुरू झाली आणि घटनास्थळी गर्दी झाली. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गर्दीला तेथून पांगवले. 

उष्माघाताची लक्षणे 
त्वचा कोरडी पडणे, शरीराच्या तापमानात वाढ होणे, चक्कर, थकवा, डोकेदुखी, उलट्या, छातीत धडधडणे, पायाचे गोळे दाटणे, अशक्तपणा, निरुत्साह, बेचैनी, बेशुद्धी, शरीरातील क्षार कमी होणे, डोळ्यापुढे अंधारी येणे अशी उष्माघाताची लक्षणे दिसून येतात. 

उन्हापासून रक्षणासाठी 
पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे सैल कपडे वापरावेत. 
शक्‍यतो उन्हात जाणे टाळावे, उन्हापूर्वी कामे पूर्ण करावीत. 
भरपूर पाणी प्यावे, कलिंगड, काकडी आहारात असावी. 
उन्हात फिरताना डोक्‍यावर टोपी ठेवावी अथवा रुमाल बांधावा. 
डोळ्यांवर गॉगल वापरावा. 
लिंबू सरबत, कैरीचे पन्हे, साखर पाणी भरपूर घ्यावे. 
ठराविक वेळेनंतर हात-पाय थंड पाण्याने धुवावेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com