खंबाटकीत मृत्यूचे तांडव 

खंबाटकीत मृत्यूचे तांडव 

खंडाळा - पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटाजवळील "एस' वळणावर टेंपो उलटून झालेल्या भीषण अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला, तर 19 जण जखमी झाले. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातग्रस्त कर्नाटकातील विजापूर भागातील असून, हे सर्वजण भोरकडे मजुरीच्या कामाला निघाले होते. जखमींना साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मृतांमध्ये एक दीड वर्षाचे बालक, सहा महिला व 11 पुरुषांचा समावेश आहे. अपघात इतका भीषण होता, की या मजुरांच्या शरीरांचे तुकडे छिन्नविच्छिन्न अवस्थेत रस्त्यावर पडले होते. 

खंडाळा पोलिसांनी सांगितले की, हे मजूर तिकोटा (ता. जि. विजापूर) येथील काम संपवून भोरकडे निघाले होते. टेंपोत 37 मजूर होते. शिवाय क्षमतेपेक्षा जास्त साहित्य कोंबून भरले होते. त्यांच्याशिवाय इतर चार जण दोन दुचाकीवरून पाठीमागून येत होते. टेंपो पहाटे साडेचार वाजता वेळे (ता. वाई) येथे आला असता सर्वजण तेथे चहा पिण्यासाठी थांबले. तेथून पुढील प्रवासासाठी निघाले. टेंपो खंबाटकी घाटातील बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर तेथे असलेल्या धोकादायक "एस' वळणावर आला. भरधाव वेगात असलेल्या गाडीवरचा ताबा सुटल्याने टेंपो लोखंडी ग्रील तोडत सेवारस्त्यावर जाऊन पलटी झाला आणि पुन्हा सुरळ उभा राहिला. टेंपोत कुदळ, टिकाव, फावड्यांसारखे साहित्य असल्याने आतील प्रवाशांवर गंभीर परिस्थिती ओढवली. मृत व जखमींची संख्या या साहित्यामुळे वाढली. अपघाताचे वृत्त समजताच जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, सहायक पोलिस निरीक्षक युवराज हांडे व तहसीलदार विवेक जाधव तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना ताबडतोब रुग्णालयात हलविण्यात आले. खंडाळा व शिरवळ पोलिस, "एनएचएआय' टीम व रेस्क्‍यू टीमने तत्काळ मदतकार्य सुरू केले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 

या अपघाताबद्दल चंद्रकांत रुपसिंग पवार (वय 19, रा. हडलगी, विजापूर) यांनी फिर्याद दिली असून, चालक मेहबूब राजासाब आतार व मुकादम विठ्ठल खिरू राठोड यांच्या विरोधात खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

मृतांची नावे पुढीलप्रमाणे - मादेवी अनिल राठोड (वय 38, रा. नागठाणे, ता. जि. विजापूर), रेखू शंकर चव्हाण (50), संतोष काशिनाथ नायक (32), मंगलाबाई चंदू नायक (42, रा. हडलगी, विजापूर), कृष्णा सोनू पवार (50, रा. राजनाळ तांडा, विजापूर), किरण विठ्ठल राठोड (15), देवाबाई मोहन राठोड (27), संगीता किरण राठोड (26, रा. मदभावी तांडा, विजापूर), देवानंद नारायण राठोड (45, हिटनळी तांडा, विजापूर), प्रियंका कल्लू राठोड (18), कल्लूबाई विठ्ठल राठोड (35), तन्वीर किरण राठोड (दीड वर्ष), विठ्ठल खिरू राठोड (40, रा. मदभावी तांडा, विजापूर), अर्जुन रमेश चव्हाण (30), श्रीकांत बासू राठोड (38), सिनू बासू राठोड (30, रा. कुडगी तांडा, विजापूर), मेहबूब राजासाब आतार (55) (चालक), माजीद मेहबूब आतार (25, आलिका रोड, विजापूर). 

जखमींची नावे 
सुनील कल्लू राठोड (20), चंदू गंगू नायक (60), विनोद कृष्णा पवार (22) (रा. राजनाळ तांडा, विजापूर), यम्मीबाई नारायण राठोड (60), सुनील विठ्ठल राठोड (10, रा. मदभावी तांडा, विजापूर), वनिता पट्टू राठोड (15, रा. एल. टी. नं. 1), रंबिता देवानंद राठोड (30, रा. हिटनळी तांडा, विजापूर), काजल अनिल राठोड ( 5, रा. नागठाणे, विजापूर), काजल अनिल राठोड (5, रा. नागठाणे, विजापूर), रोहित देवानंद राठोड (18, रा. हिटनळी तांडा, विजापूर), पूजा कित्तू राठोड (14, रा. उडातांडा, विजापूर), एकनाथ चंदू राठोड (18, रा. हडलगी, विजापूर), शांताबाई रुपसिंग पवार (60, रा. हडलगी, विजापूर), सचिन फत्तू राठोड (18, रा. मदभावी तांडा, विजापूर), निकिता श्रीकांत राठोड (22, रा. कुडगी तांडा, विजापूर), शांताबाई रेखू चव्हाण (60, हडगली, विजापूर), विद्या श्रीकांत राठोड (दीड वर्ष, रा. कुडगी तांडा, विजापूर), अनिल रेखू चव्हाण (24, रा. हडलगी, विजापूर), किरण तेंदू राठोड (25, रा. एल. टी. नं.1), किरण प्रेमचंद राठोड (30, रा. हडळसन, विजापूर). 

धोकादायक "एस' वळण 
खंबाटकी घाटातील इंग्रजी "एस' आकाराचे धोकादायक वळण वारंवार जीवघेणे ठरत आहे, याची प्रचिती आज पुन्हा या अपघातामुळे आली. या ठिकाणी अक्षरशः मृत्यूचे तांडव नेहमी घडत असताना संबंधित विभाग बेशिस्तपणे वागत आहे. अजून किती बळी हवेत? अशी आर्त हाक वाहनधारकांसह प्रवाशांतून ऐकायला येत आहे. हे वळण म्हणजे "मृत्यूचा घाट' असे समीकरणच बनले. 2001 पासून आजपर्यंत अनेक बळी या वळणाने घेतले आहेत. शेकडो लोक कायमचे जायबंदी झाले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com