बा विठ्ठला... नाथपंथीयांच्या पुनर्वसनाची सद्‌बुद्धी दे ! 

rainpada
rainpada

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्‍वासन दिल्याप्रमाणे राईनपाडा हत्याकांडातील मृतांच्या नातेवाइकांना सरकारी मदत मिळाली. अक्षरशः उघड्यावर दिवस कंठणाऱ्या नाथपंथी डवरी समाजातील सदस्यांची स्थिती अगदी शोचनीय झाली होती. सरकारी मदतीनंतर आता गरज आहे ती सामाजिक पुनर्वसनाची... ते लवकर व्हावे यासाठी मुख्यमंत्र्यांना सद्‌बुद्धी देण्याचे विठ्ठलालाच साकडे घालावे लागणार आहे. 

मुले पळविणारी टोळीच्या संशयातून राईनपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथे ता. 1 जुलैला भिक्षा मागणाऱ्या नाथपंथी डवरी समाजातील पाचजणांना अक्षरशः ठेचून मारले. या हत्याकांडाचे समर्थन होऊच शकत नाही. सोशल मीडियाचा प्रभाव वाढल्याचे हे द्योतक ठरले. केवळ पोट भरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नाथपंथी डवरी समाजातील मंगळवेढा तालुक्‍यातील खवे, मानेवाडी आणि गुंदवाण (ता. इंडी, कर्नाटक) येथील एका सदस्याचा हत्या झालेल्यांत समावेश आहे. सरकारने दिलेल्या मदतीने मृतांच्या नातेवाइकांचे झालेले नुकसान भरून येणार नाही. पण थोडा आधार जरूर वाटेल. आता खरी गरज आहे ती समाजाच्या सामाजिक पुनर्वसनाची...! 

भारतीय राज्यघटनेतील कलम 21 प्रमाणे सर्वांनाच प्रतिष्ठेने जीवन जगण्याचा अधिकार आहे, परंतु स्वातंत्र्यानंतर तब्बल 70 वर्षांनंतरही नाथपंथी समाजातील सदस्य अजूनही भिक्षा मागतात. समाजाची मानसिकता बदललेली नाही. हा समाज अजूनही प्रवाहाबरोबर नाही. प्रतिष्ठा, विकास, प्रगती अशा शब्दांपासून कोसो दूर असलेल्या या समाजातील सर्वच घटकांवर राईनपाडा प्रकरणाने मोठा आघात झाला आहे. तरुणांची मनं पेटू लागली आहेत. "पेटला रे पेटला नाथपंथी पेटला' अशा भावना तरुणाईतून व्यक्त होऊ लागली आहे. या पेटलेल्या तरुण मनांचा वेळीच ठाव घेऊन त्यावर तातडीने उपाय योजण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. 

दुदैवाचा सोलापूर पॅटर्न ! 
सततच्या पाठपुराव्यानंतर शासनाने पारधी पुनर्वसन विकास योजना सुरू केली. यालाही बेंदवस्ती (ता. माढा) येथील भीषण हत्याकांडाचे कारण घडावे लागले. तत्कालीन गृहमंत्री (कै.) आर. आर. पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. दुर्दैवाने अशा घटनांना सोलापूर पॅटर्न म्हणावे लागत आहे. आता पारधी समाज प्रवाहात येऊ लागलेला आहे. याच पार्श्‍वभूमीवर नाथपंथी डवरी समाजाचाही शासन दरबारी विचार होणे गरजेचे आहे. यासाठी समाजातून पुढाकाराची शक्‍यता कमीच. अगदी बोटावर मोजण्याइतकी संख्या उच्चशिक्षित आहे. त्यामुळे सरकारी दरबारी वजन पडण्याची शक्‍यता धूसरच ! फिरस्ता असलेल्या या समाजाचे थेट मतात रूपांतर होण्याची शक्‍यता कमीच असल्याने राजकीय पटलावर पाठपुरावा अशक्‍य वाटतो. त्यामुळे समाजाच्या सामाजिक पुनर्वसनासाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे घालण्यासाठी सामान्यांचा तारणहर्ता विठ्ठलच धावून यावा लागेल. एकादशीच्या महापूजेसाठी श्री. फडणवीस येत आहेत. या निमित्ताने त्यांना हे साकडे !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com