महामार्गालगतचे छोटे शेतकरी अडचणीत 

महामार्गालगतचे छोटे शेतकरी अडचणीत 

सातारा - जिल्ह्याचा प्रादेशिक विकास आराखडा तयार करण्यात आला असून, त्याचे सातारा प्रदेश असे नामकरण केले आहे. या आराखड्यात शहराजवळून जाणाऱ्या महामार्गाच्या दोन्ही बाजूने ग्रीन झोन टाकण्यात आला आहे. महामार्गाच्या रुंदीकरणात जमीन गेली आहे. उर्वरित जमीनही ग्रीन झोनमध्ये गेल्याने नव्याने खरेदी केलेल्यांची अडचण होणार आहे. हा आराखडा सहा महिन्यांत शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. आराखड्यात अनेक त्रुटी असल्याने यावर आगामी चार महिन्यांत हरकती घेता येणार आहेत. 

आतापर्यंत जिल्ह्याची प्रादेशिक योजना तयारच केलेली नव्हती. सध्याचा जमीन वापर, प्रदेशातील विविध भागांची वैशिष्ट्ये, विविध भागांची बलस्थाने, कमतरता विविध अभ्यास गटांकडून आलेल्या शिफारसी विचारात घेऊन संतुलित आणि सुनियंत्रित व शाश्वत विकासाच्या उद्देशाने ही प्रादेशिक योजना तयार केली आहे. 2016 ते 2036 या कालावधीत ही योजना लागू राहणार आहे. महाबळेश्‍वर आणि पाचगणी वगळून उर्वरित जिल्ह्याचा प्रादेशिक आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात शहराच्या जवळून जाणाऱ्या महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी ग्रीन झोन टाकण्यात आला आहे. अगोदरच महामार्गाच्या रुंदीकरणात जमीन गेल्यामुळे आणि उरलेली जमीनही ग्रीन झोनमध्ये येणार आल्यामुळे अनेकांची अडचण झाली आहे. यासंदर्भात काही नागरिकांनी नगरविकास विभागाकडे तक्रारीही केल्या आहेत. नव्याने ग्रीन झोन लागू झालेल्या जमिनी यापूर्वी बिगरशेती झाल्या असतील, तर त्यांना काहीच अडचण येणार नाही. मात्र, नव्याने बिगरशेती करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आणि महामार्गाजवळच्या जमिनी किमान एक हेक्‍टर (अडीच एकर) असणे आवश्‍यक असेल. याचा फटका महामार्गाशेजारील अनेक लहान शेतकऱ्यांना बसणार आहे. वाहतूक परिवहन व दळणवळण अभ्यास गटाच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय महामार्गाची रुंदी 60 मीटर, प्रमुख राज्य मार्ग 45 मीटर, तर जिल्हा मार्ग 30 मीटर रुंदीचा असावा, असे नमूद केले आहे. इतर जिल्हा मार्ग 25 आणि ग्रामीण मार्ग 18 मीटरचा प्रस्तावित केला आहे. 

गावांची हद्द निश्‍चिती... 
विकास आरखडा तयार करताना ग्रामीण भागासाठी एका हेक्‍टरमध्ये 50 व्यक्ती बसू शकतात, तर शहरी भागासाठी प्रती हेक्‍टर 100 व्यक्ती अशी घनता ठरविली आहे. त्यानुसार शून्य ते पाच हजार लोकसंख्येसाठी गावठाणाच्या 750 मीटर क्षेत्रात विस्तारित रहिवास, तर पाच ते 10 हजार लोकसंख्येच्या गावांसाठी 1500 मीटर विस्तारित रहिवास क्षेत्र ठेवण्यात आले आहे. 

दहा विकास केंद्रे 
शिरवळ ग्रामीण, वाई नागरी विकास, फलटण नागरी विकास, सातारा नागरी विकास, विडणी, मायणी, रेठरे, उंब्रज, सैदापूर, बावधन अशी दहा विकास केंद्रे तयार केली आहेत. 

पठारांचे विभाजन... 
जिल्ह्यातील विविध पठारांचे तीन भागांत विभाजन केले आहे. यामध्ये कास पठार समूह, चाळकेवाडी पठार समूह, सडावाघापूर पठार समूह. विशेषतः संवदेनक्षम पश्‍चिम भागातील डोंगर उतार, पठारे, सडे यांचे संवर्धन, गौण खणिज उत्खनन, व्यवस्थापन खनिज आणि वाहतूक, पवनचक्‍क्‍या उभारणी, साखर आणि इतर उद्योग इत्यादींचा विकास हा कायदेपालन आणि सामाजिक कर्तव्य समजून, तसेच नैतिकतेच्या जबाबदारीने होणे आवश्‍यक असल्याचे प्रादेशिक अहवालात नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com