अन् 'यांच्या' एन्ट्रीने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या !

His entry attracted the attention of the attendees in karhad
His entry attracted the attention of the attendees in karhad

कऱ्हाड - माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व उंडाळकर गटाच्या मनोमिलन होण्याच्या चर्चेला तालुक्यात अनेक दिवसांपासून वेग आला आहे. त्यातच जिल्हा परिषद सदस्य व युवा नेते अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची आज येथे एका ठिकाणी एकाचवेळी झालेल्या एन्ट्रीने उपस्थितांच्या भुवया मात्र उंचावल्या. दोघांमध्येही नजरानजर न टाळल्याने उपस्थितांची शिगेला पोहोचलेली उत्सुकता मात्र मावळली. निमित्त होतं जेष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त येथील समाधीस्थळी अभिवादनासाठीचे.

येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनासमोर जेष्ठ नेते (कै) पी. डी. पाटील यांची समाधीस्थळी आज सकाळपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरीकांनी अभिवादनासाठी गर्दी केली आहे. दुपारी पावणे दोनच्या सुमारास जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर कार्यकर्त्यांसह तेथे दाखल झाले. ते समाधीस्थळी जात असतानाच पाठोपाठ माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हेही तेथे पदाधिकाऱ्यांसह दाखल झाले. दोघांच्या एकाचवेळी झालेल्या एंन्ट्रीने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. सर्वांच्या नजरा दोघांवर रोखल्या गेल्या. अॅड. उंडाळकर समाधीस्थळी अभिवादन करून समाधीला प्रदक्षिणा घालत असताना आमदार चव्हाण तेथे पोहोचले. त्याचवेळी अभिवादनासाठी येणाऱ्या मान्यवर, नागरीकांची भेट घेण्यासाठी लगत उभारलेल्या मंडपात असणाऱ्या आमदार बाळासाहेब पाटील यांना समाधीस्थळी मान्यवर आल्याचे समजल्याने ते समाधीस्थळाकडे निघाले. त्यावेळी अभिवादन करून परतताना आमदार पाटील यांची  अॅड. उंडाळकर यांची भेट झाली. त्यावेळी आमदार पाटील यांनी अॅड. उंडाळकर यांच्याशी हस्तांदोलन करत स्वागत केले. त्याचवेळी अॅड. उंडाळकर यांनी समाधीस्थळी अभिवादन करणाऱ्या आमदार चव्हाण यांच्या दिशेने इशारा करत आमदार पाटील यांना बाबा आलेत तिकडे जावा, आम्ही थांबतोय असे सूचित केले.

आमदार पाटील यांचे बंधू जयंत पाटील यांच्यासमवेत अॅड. उंडाळकर लगतच्या मंडपात चहापानासाठी गेले. त्यानंतर आमदार चव्हाण व आमदार पाटील यांनी एकत्र समाधीस अभिवादन केले. तेथून तेही चहापानासाठी मंडपात आले. मात्र मंडपातही काही राजकीय भेटीची घडामोड होईल याच्या उत्सुकतेने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र मंडपाच्या दोन्ही टोकाला दोघेजण बसले. तसेच अॅड. उंडाळकर शिवाजी हायस्कूलच्या प्रवेशद्वाराच्या बाजूने बाहेर पडल्याने दोघेही पुन्हा समोरासमर न आल्याने उपस्थितांची उत्सुकता मावळली.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com