हॉटेलमधूनच महिला सदस्या हायजॅक 

हॉटेलमधूनच महिला सदस्या हायजॅक 

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत भाजप आघाडीसोबत राहिलेल्या व सभापती निवडीच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी कॉंग्रेस आघाडीला मिळालेल्या सदस्या राणी खलमेट्टी यांना आज सकाळी हॉटेलमधूनच "हायजॅक' करून थेट मतदानाला आणले. सौ. खलमेट्टी यांनीही आपण ताराराणी आघाडीसोबतच राहणार असल्याचे सांगत हॉटेलमध्ये रोखू पाहणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी सदस्यांना चांगलेच झापले. 

या घटनेने हॉटेल परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील कार्यकर्त्यांसह हॉटेलमध्ये आले; पण तोपर्यंत सौ. खलमेट्टी यांना बेळगावला पोचवण्यात आले होते. या घटनेने हॉटेल परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले. 

जिल्हा परिषदेतील सभापती निवडीच्या पार्श्‍वभूमीवर सौ. खलमेट्टी यांना 31 मार्चला कॉंग्रेस आघाडीने आपल्या गोटात घेतले होते. 

सौ. खलमेट्टी या जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील यांच्या कार्यकर्त्या. त्यांना आपल्याकडे घेण्यासाठी श्री. पाटील यांचे जिल्हा बॅंकेतील कर्ज प्रकरण रोखून धरले होते. त्यामुळे श्री. पाटील यांनी शुक्रवारी सौ. खलमेट्टी यांना कॉंग्रेस सदस्यांसोबत सहलीवर पाठवले. त्यानंतर बॅंकेने श्री. पाटील यांचे कर्ज त्यांच्या कारखान्याच्या नावावर जमा केले. 

सहलीवर गेलेल्या कॉंग्रेस आघाडीच्या सदस्यांना काल (ता. 2) रात्री एक वाजता मार्केट यार्डसमोरील हॉटेल रसिकामध्ये आणले होते. त्यात सौ. खलमेट्टी यांचाही समावेश होता. आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास दोन वाहनांतून आलेल्या ताराराणी आघाडीच्या आठ-दहा तरुणांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य कोठे आहेत, अशी विचारणा व्यवस्थापकाकडे केली. यावर व्यवस्थापकांनी उत्तर न दिल्याने हे तरुण थेट सदस्य ठेवलेल्या रूमकडे गेले. तोपर्यंत सौ. खलमेट्टीच बाहेर आल्या. त्यांनी मी तुमच्यासोबत येते, असे म्हणत हॉटेलची रूम सोडली. पाच-दहा मिनिटांच्या या थरारात हे तरुण सौ. खलमेट्टी यांना वाहनात बसवून मतदानाला घेऊन गेले. 

ही माहिती कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना समजताच कार्यकर्त्यांसह ते हॉटेलमध्ये आले. तोपर्यंत सौ. खलमेट्टी या मतदान करून बेळगावला निघून गेल्या होत्या. या प्रकाराने मात्र हॉटेल परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले. त्याचे पडसाद निवडी वेळी उमटू नयेत म्हणून जिल्हा परिषदेबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

विजय बोरगेंचा नमस्कार 
सौ. खलमेट्टी यांना नेण्यासाठी हॉटेलमध्ये घुसलेल्या तरुणांना पाहून राष्ट्रवादीचे सदस्य विजय बोरगे यांनी त्यांना नमस्कार केला. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी झालेल्या सभेला श्री. बोरगे गैरहजर होते. पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत कारवाई होईल म्हणून ते पुन्हा स्वगृही परतले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com