बारावीची सगळीच पोरं हुशार कशी?

- युवराज पाटील
रविवार, 5 मार्च 2017

कोल्हापूर - बारावीच्या परीक्षेला पन्नास हजारांहून अधिक विद्यार्थी सामोरे जात असताना गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात केवळ एकच कॉपीचे प्रकरण उघडकीस आले आहे. सरकारी खर्चाने जाणाऱ्या भरारी पथकाच्या कार्यक्षमतेबाबत यामुळे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून, कोल्हापूर विभागीय मंडळाकडे कॉपीचे प्रकरण येणे जवळजवळ बंद झाले आहे.

कोल्हापूर - बारावीच्या परीक्षेला पन्नास हजारांहून अधिक विद्यार्थी सामोरे जात असताना गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात केवळ एकच कॉपीचे प्रकरण उघडकीस आले आहे. सरकारी खर्चाने जाणाऱ्या भरारी पथकाच्या कार्यक्षमतेबाबत यामुळे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून, कोल्हापूर विभागीय मंडळाकडे कॉपीचे प्रकरण येणे जवळजवळ बंद झाले आहे.

बारावी, दहावीची मुले वर्षभर अभ्यासासाठी झटत असतात. शेवटच्या टप्प्यात रात्रीचा दिवस करून ही मुले अभ्यास करतात; मात्र कॉपीबहाद्दरांमुळे हुशार मुलांवर अन्याय होतो. कॉपी रोखण्यासाठी बोर्ड उपाययोजना करते; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या स्तरावर मात्र गोंधळाची स्थिती आहे. कुठल्या संस्थेशी कशाला वाकडे घ्यायचे, असा विचार करून कॉपी न पकडण्यावरच भरारी पथकातील सदस्यांचा भर असतो. व्यवसाय मार्गदर्शन अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली असलेले पथक वगळता अन्य पथके निद्रिस्त अवस्थेत असल्यासारखी स्थिती आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी, डायट, प्राथमिक शिक्षणाधिकारी अशी 
पथके आहेत. 

दरवर्षी दहावी बारावीची निकालाची टक्केवारी वाढत आहे. त्यामागे कॉपीला दिले जाणार प्रोत्साहन हे एक कारण आहे. भरारी पथकातील सदस्यांना आपली नियुक्ती भेट देण्यासाठी आणि कॉपी पकडण्यासाठी आहे, याचा विसर पडला आहे. दैनंदिन कामातून वेळ मिळाला तर ही पथके केंद्रावर जातात. कॉपी तपासायला नव्हे, तर फिरायला गेल्यासारखी पथकांची स्थिती आहे. काही शाळांना पथक येणार आहे, याची अगोदरच माहिती होते. त्यामुळे जागरूक पर्यवेक्षक विद्यार्थ्यांना कॉपी फेकून देण्याचा सल्ला देतात. एकदा कॉपी फेकली की पुरावा राहात नाही. त्यामुळे पथक तपासणार काय, असा प्रश्‍न उपस्थित होतो.

परीक्षेच्या काळात पथकासाठी सरकारी तिजोरीतून सुमारे चौदा हजारांचा खर्च होतो. कॉपीची केस करायची नसेल तर पैसे कशासाठी खर्च करायचे, असा प्रश्‍न आहे. बारावीची परीक्षा परीक्षा सुरू होऊन चार दिवस उलटले आहेत. गारगोटी येथे पहिल्या पेपरवेळी झालेले कॉपी प्रकरण वगळता अन्य केंद्रांवर एकही कॉपी सापडलेली नाही. यावरूनच भरारी पथकाची कार्यक्षमता स्पष्ट होते.

कस्टोडियनचेही दुर्लक्ष
पथकाबरोबर कस्टोडियन हा घटक महत्त्वाचा आहे. त्यांच्या ताब्यात प्रश्‍नपत्रिका असतात. पूर्वी कस्टोडियन कॉपी केस करायचे, मात्र ज्या संस्थेत नोकरी करायची आहे, तेथील विरोध कशाला घ्या, या उद्देशाने कस्टोडियनच्या स्तरावरही कॉपी रोखण्याचे प्रमाण नगण्य झाले आहे. परीक्षा तोंडावर आली की कॉपीसाठीच्या प्रसिद्ध केंद्रांची घोषणा होते. तिकडे फिरकत मात्र कुणी नाही. पूर्वी तोतया विद्यार्थी आणि कॉपीची प्रकरणे सर्वाधिक असायची. काळाच्या ओघात तोतया विद्यार्थी कमी झाले की कॉपी न करण्याइतकी सगळीच मुले हुशार झाली, असा प्रश्‍न या क्षेत्रातील जाणकारांना पडला आहे.

Web Title: How really smart kids Board?