पालकांची घालमेल; विद्यार्थ्यांची धडपड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

कोल्हापूर - पेपरची वेळ झाली तरी मुले वर्गात पोचली की नाही याची चिंता, नंबर सापडला असेल ना, पेपर तर अवघड नसेल ना, असे असंख्य प्रश्‍न मनात घेऊन फाटकाबाहेर उभे राहिलेले पालक, वर्गखोली गाठण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, कॅम्पसमधील करडी शिस्त अशा वातावरणात बारावीच्या लेखी परीक्षेस आजपासून सुरवात झाली. अनेक दिवसांपासून परीक्षेची पालकांसह विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागून राहिली होती. तो दिवस अखेर आज उजाडला. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतून एक लाख ३२ हजार विद्यार्थी परीक्षेस सामोरे जात आहेत.

कोल्हापूर - पेपरची वेळ झाली तरी मुले वर्गात पोचली की नाही याची चिंता, नंबर सापडला असेल ना, पेपर तर अवघड नसेल ना, असे असंख्य प्रश्‍न मनात घेऊन फाटकाबाहेर उभे राहिलेले पालक, वर्गखोली गाठण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, कॅम्पसमधील करडी शिस्त अशा वातावरणात बारावीच्या लेखी परीक्षेस आजपासून सुरवात झाली. अनेक दिवसांपासून परीक्षेची पालकांसह विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागून राहिली होती. तो दिवस अखेर आज उजाडला. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतून एक लाख ३२ हजार विद्यार्थी परीक्षेस सामोरे जात आहेत.

पूर्वी दहावी-बारावीची परीक्षा म्हटले की, शाळा आणि महाविद्यालयीन व्यवस्थापनाच्या दृष्टीने डोकेदुखी ठरायची. खिडकीतून कोण कधी डोकावतो आणि कॉपी टाकून पळून जातो, याकडे लक्ष लागून राहायचे. आता ज्या शाळा, महाविद्यालयात बैठक व्यवस्था असते तेथील व्यवस्थापनाने शिस्त लावली आहे. एकदा पेपर सुरू झाल्यानंतर ‘पंछी भी पर नही मार सकता’ इतका कडक पहारा शिपाई आणि अन्य कर्मचाऱ्यांचा होता. पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांच्या चेहऱ्यावर ताण दिसत होता.

वर्गखोली आणि क्रमांक पाहायला आयत्यावेळी धावपळ होते. यासाठी पेपरच्या अगोदर अर्धा तास साडेदहाच्या सुमारास विद्यार्थ्यांनी केंद्रावर पोचावे, असे आवाहन परीक्षा मंडळाने केले होते. पालकांनी मात्र सकाळी दहालाच केंद्र गाठले. काही महाविद्यालयांत पालकांना मुख्य दरवाजाच्या बाहेर थांबवून केवळ विद्यार्थ्यांना आत सोडले. विद्यार्थी आत गेले, पण तासभर थांबून करायचे काय, असा प्रश्‍न होता. उन्हाचा तडाखा वाढत होता. मात्र मुलगा अथवा मुलगीला वर्गखोली सापडली की नाही, याची चिंता पालकांच्या चेहऱ्यावर दिसत होती. साडेदहानंतर जी मंडळी दाखल झाली त्यांना एकतरी लवकर गाडी लावायला जागा मिळेना, अशी स्थिती झाली. शहरातील सर्वच शाळा, महाविद्यालयांच्या बाहेर मोठ्या संख्येने दुचाकी आणि चारचाकी गाड्या थांबून होत्या. जे उशिरा दाखल झाले त्यांना केंद्रापासून दूर अंतरावर गाडी लावण्याची वेळ आली. 

साडेदहाच्या सुमारास विद्यार्थ्यांना वर्गात जाण्याची परवानगी देण्यात आली. चप्पला, बूट बाहेर काढून वर्गात प्रवेश देण्यात आले. सर्व विद्यार्थी वर्गात पोचल्यानंतर व्हरांडा मोकळा करण्यास सुरवात झाली. ज्या ठिकाणी पालक आतमध्ये थांबून होते त्यांना बाहेर जाण्याची विनंती करण्यात आली. बाहेर थांबूनही घड्याळ्याचा काटा अकरावर सरकल्याशिवाय पालकांचा काही पाय निघत नव्हता. अकराची बेल झाली, पेपर सुरू झाला. नंतर थोडा वेळ थांबून पालक निघून गेले. दुपारी दोनच्या सुमारास पेपर सुटला आणि पालकांची पुन्हा केंद्रावर गर्दी झाली. पेपर कसा होता, सगळे प्रश्‍न सोडवलेस का, गुणांची चिंता नको, जेवढे पडतील तेवढे पडतील, असा धीर देत पालक विद्यार्थ्यांनी घरी घेऊन गेले.

सुपरवायझरची अशीही हुकूमशाही 
कसबा बावडा रस्त्यावरील एका महाविद्यालयात एका सुपरवायझरच्या हुकूमशाहीमुळे पालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. मुख्य दरवाज्याच्या बाहेर थांबून असलेल्या या गृहस्थाने एकाही पालकाला आतमध्ये सोडले नाही. केंद्राच्या आवारात शिस्त हवीच. पण बाहेर उभे राहायलाही जागा नसल्याने पालकांनी अक्षरशः कंपाउंडच्या बाजूला उभे राहून आपला पाल्य कुठे नजरेस पडतो का, हे पाहताना दिसत होते.

Web Title: hsc exam start