कष्टकरी महिलांचे... मन भारावले.... डोळे पाणावले 

कष्टकरी महिलांचे... मन भारावले.... डोळे पाणावले 

जत - येथे जागतिक महिला दिन... वेळ सकाळी अकराची... शेतात घाम गाळून मोती पिकविणाऱ्या कष्टकरी महिलांचे पाऊल जगताप ट्रस्टच्या राजमाता भवनाकडे वळत होते.... प्रमुख पाहुण्यांचे आगमन... पुरस्कारासाठी नाव पुकारले गेले... प्रत्येकीचा उर भरून आला... भारावलेल्या मनानी सत्कार स्वीकारताना आनंदआश्रूने डोळे पाणावले... निमित्त होतं जत तनिष्का गटाच्या वतीने आदर्श महिला शेतकरी पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे. 

महिला शेतातील बहुतेक कामे पार पाडत असतात. शेतीचा डोलारा तिच्या श्रमशक्‍तीवर तोललेला आहे. पण ती शेती निर्णय प्रक्रियेत उपेक्षित राहिली आहे. समाजप्रती तिचे स्थान दुय्यम राहिले. त्यामुळे घाम घाळून पिकविणऱ्या तिची उपेक्षाचा झाली. या धागा ओळखून येथील तनिष्का गटाच्या अध्यक्षा दीप्ती सावंत यांनी आदर्श महिला शेतकरी पुरस्कार देण्याचा आगळा वेगळा संकल्प केला. 

येथील राजमाता जिजाऊ सभागृहात या कष्टकरी महिलांचा सत्कार समारंभ झाला. 

पांडोझरी येथील गायत्री पुजारी यांनी दुष्काळाशी सामना करीत ड्रॅगन फ्रूटची शेती पिकविली आहे. हे फळ बहुदा विदेशात पिकतं. पण कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून त्यांनी हे घेतले आहे. ते इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून रोपांची विक्रीही करतात. त्यांचा यथोचित सत्कार करून पुरस्कार देण्यात आला. तसेच पतीचे निधन झाल्यानंतर नुकतीच लावलेली द्राक्ष बागा अनेक संकटांना तोंड देत फुलविणाऱ्या हिवरे येथील संगीता शिंदे यांनाही पुरस्कार देण्यात आला. तसेच विनयशीला डफळे यांचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याचबरोबर शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध फळबागांची लागवड करणाऱ्या शेतकरी महिलांचा सत्कार करण्यात आला. उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, आमदार विलासराव जगताप यांच्या पत्नी उर्मिला जगताप, "सकाळ'चे जाहिरात व्यवस्थापक उदय देशपांडे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नूतन जिल्हा परिषद सदस्या सौ. मंगल नामद, सौ. रेखा बागेळी व सौ. सुनीता पवार यांचाही सत्कार करण्यात आला. 

सरिता मालाणी यांनी प्रास्ताविक केले. विजयालक्ष्मी बिरादार, उदय देशपांडे, तनिष्काचे ओंकार कोठावळे यांनी मनोगत व्यक्‍त केले. पायल मालाणी, सीमा पट्टणशेट्टी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मीनाक्षी अंकलगी, निशा गडीकर, सिंधुताई माळी, निर्मला इंगोले, व्दारका जाधव, डॉ. सोनल थोरात, रुक्‍मिणी जाधव, रूपाली सावंत, सुरेखा बाबर, कृतिका पट्टणशेट्टी, राजलक्ष्मी लक्ष्मी पाटील, विजया वाघमोडे, संगीता सावंत, तृप्ती जवळेकर, वैष्णवी इंगोले, मालाश्री चव्हाण, विजया बिज्जरगी, अनुराधा संकपाळ, अनिता संकपाळ, पार्वती निडोणी, नीलम थोरात, नयना सोनवणे, भारती तेली, शैला तेली, माधुरी उमराणी, प्राची जोशी उपस्थित होते. 

शेतीतील सर्व कामे महिला करतात. अनेक महिलांनी घाम गाळून कोट्यवधीचे उत्पन्न काढले आहे. अशा समाजापासून दूर राहिलेल्या महिलांना पुरस्कार देऊन तनिष्काने त्यांना बळ दिले आहे. 

उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे. 

जतसारख्या दुष्काळी भागात फळबागा परवडत नाहीत. पाण्याच्या अभावामुळे बागा करपून जातात. अशा परिस्थितीत कमी पाण्यावरील पिकांच्या शोधात असताना ड्रगन फ्रूटची संकल्पना पटली. त्यानुसार ही शेती मी केली आहे. तनिष्काने पुरस्कार देऊन माझाच नव्हे तर समस्त महिला शेतकऱ्यांचा गौरव केला आहे. 

गायत्री पुजारी, महिला शेतकरी, पांडोझरी 

शेतीचा शोध लावणारी महिलाच आज शेतात राबवून मोती पिकवत असताना तिच्या कर्तृत्वाला समाज नाकारतो आहे. हे थांबले पाहिजे, शेतीविषयक निर्णय प्रक्रियेत तिचा समावेश व्हावा. तिला योग्य सन्मान मिळावा, यासाठी महिला शेतकऱ्यांना पुरस्कार देण्याचा तनिष्काने निर्णय घेतला. 

दीप्ती सावंत, तनिष्का अध्यक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com