बेकायदेशीर गर्भपातप्रकरणः संशयित सरकारी सेवेत

 बेकायदेशीर गर्भपातप्रकरणः संशयित सरकारी सेवेत

सांगली - गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपातप्रकरणी गुन्हा दाखल झालेले चौगुले पती-पत्नी दोघेही सरकारी वैद्यकीय अधिकारी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. कुणाला माफी नाही, असा इशारा महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी दिला.

दरम्यान, आज आणखी दोन गर्भपाताचे प्रकार उघडकीस आले. तर सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांचाही या हॉस्पिटलमध्ये संपर्क असल्याचे समोर आले आहे. आयुक्त खेबुडकर यांनी पत्रकार बैठकीत या प्रकाराची माहिती दिली. 

ते म्हणाले, ‘चौगुले हॉस्पिटलबाबत १४ तारखेस तक्रार आली. त्यावरून आरोग्य विभागाला कारवाईचे आदेश दिले. या ठिकाणी पथकाने छापा टाकून तपासणी केली असता त्यामध्ये सात केसपेपर सापडले. त्यावर ‘एमटीपी’ म्हणजे गर्भपात करण्याचे स्पष्ट उल्लेख दिसून आले. त्यावर रुग्णाचा इतिहास, गर्भपाताचे कारण असे काही नाही. पथकाने आजही हॉस्पिटलमध्ये तपासणी केली. आज आणखी दोन बेकायदेशीर गर्भपाताचे प्रकार उघडकीस आले. यातील एक प्रकार तासगावातील आहे. २० आठवड्यांच्या आतील गर्भपात केल्याचे दिसून आले आहे.’

स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. रूपाली चौगुले आणि त्यांचे पती विजयकुमार चौगुले दोघेही सरकारी वैद्यकीय अधिकारी आहेत. डॉ. रूपाली चौगुले यांची नेमणूक आटपाडी ग्रामीण रुग्णालयात आहे. मात्र, त्या तेथे तीन-चार महिन्यांपासून कामावर नाहीत. त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती. त्यांच्याविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव ठेवणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितल्याची माहिती आयुक्तांनी दिली. विजयकुमार चौगुले हे गारगोटी (जि. कोल्हापूर) येथील ग्रामीण रुग्णालयात सेवेत आहेत. त्यांच्यावरही कारवाईची शक्‍यता आहे.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर चौगले डॉक्‍टर दाम्पत्य आणि डॉ. स्वप्नील जमदाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रूपाली यांना चक्कर येऊन छातीत दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले, तर त्यांचे पती विजयकुमार यांना पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. कवठेकर यांनी दिली. मात्र, त्यानंतरही त्यांच्यावर अटकेची कारवाई पोलिसांनी केलेली नाही.

सांगली, कोल्हापूर, सोलापूरचे लिंकिंग
श्री. खेबुडकर म्हणाले, ‘चौगुले हॉस्पिटलला एमटीपी करण्याचा परवाना नव्हता. त्यांच्याकडे नर्सिंग होमचा परवाना आहे. तो रद्द करून हॉस्पिटल सील करण्याचे आदेश दिले आहेत. केसपेपरवरून नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांच्याही चौकशीची सूचना पोलिस उपअधीक्षकांना केली आहे. सांगलीसह कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील डॉक्‍टरांची शिफारस दिसून येते. त्यांचीही चौकशी होईल. शिवाय कुठल्या सोनोग्राफी सेंटरमध्ये तपासणी केली जात होती, त्याचाही शोध घेण्यात येईल. हे मोठे रॅकेट असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.’

वैद्यकीय अधीक्षकांचेही कनेक्‍शन
सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुबोध उगाणे याच रुग्णालयात खासगी प्रॅक्‍टिस करत होते, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. कवठेकर यांनी दिली. त्यांचा या घटनेशी काही संबंध आहे का, याचा तपास करण्याबाबत वैद्यकीय अधिष्ठात्यांना लेखी कळवणार असून, या प्रकरणाचा अहवाल आरोग्य उपसंचालकांना पाठवणार असल्याचे आयुक्त खेबुडकर यांनी सांगितले. 

सर्व हॉस्पिटलच्या तपासणीसाठी दहा पथके
महापालिका क्षेत्रातील सर्व हॉस्पिटल्सची तपासणी करण्यासाठी दहा पथके तयार केली आहेत. सात दिवसांत तपासणी पूर्ण करणार. यात जनरल प्रॅक्‍टिशनर्ससह सर्व हॉस्पिटल तपासण्यात येतील, असे खेबुडकर म्हणाले. नर्सिंग होम ॲक्‍ट अंतर्गत महापालिका क्षेत्रात ३६० हॉस्पिटल आहेत. दर तीन महिन्यांनी हॉस्पिटल तपासणी करण्याचा नियम असताना चौगुले हॉस्पिटलची गेले एक वर्ष तपासणी केली नाही, असे आरोग्य अधिकारी डॉ. कवठेकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com