बेकायदेशीर गर्भपात प्रकरणः छाप्याआधी वावरणारे अधिकारी कोण?

 बेकायदेशीर गर्भपात प्रकरणः छाप्याआधी वावरणारे अधिकारी कोण?

सांगली - गणेशनगरमध्ये डॉ. रूपाली  चौगुलेच्या भ्रूण हत्येच्या कत्तलखान्याचे भागीदार आरोग्य यंत्रणेतील काही नग अधिकारी असल्याचे दिसून येते. आठवड्यापूर्वी ‘आपले सरकार’ ॲपवर याबाबत तक्रार पडली. मात्र, त्याआधी असे गैरप्रकार रोखण्यासाठी कार्यरत असणाऱ्या यंत्रणा, समित्या काय करीत होत्या? म्हैसाळ येथील खिद्रापुरेच्या प्रकरणातून जिल्हा आरोग्य यंत्रणेने कोणता बोध घेतला? असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

म्हैसाळमधील खिद्रापुरेचा कसाईखाना उघडकीस आल्यानंतर आरोग्य यंत्रणेचे पार धिंडवले निघाले. महापालिका क्षेत्रातील रुग्णालयाची तपासणी करण्यासाठी दहा पथके असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले आहे. मात्र गेल्या वर्षभरात या पथकाने एकही ठोस कारवाई केलेली नाही. आठ दिवसांपूर्वी ‘आपले सरकार’ ॲपवर तक्रार आल्यानंतर अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. त्यानंतर चौगुलेंच्या हॉस्पिटलच्या आवारात महापालिकेतील आरोग्य यंत्रणेचे कर्मचारी घिरट्या घालत असल्याचे हॉस्पिटलमधील काही कर्मचाऱ्यांनी खासगीत सांगितले. ते कर्मचारी कशासाठी तिथे घुटमळत होते?

छाप्यातही ढिलाईपण दाखवल्याने रुग्णालयाच्या परिसरातच औषधे आणि कागदपत्रे जाळण्यात आली. चार-पाच तास तपासणी करून कागदपत्रे जप्त केली. त्यानंतर या गुन्हा दाखल झाला. दुसऱ्या दिवशी  पोलिसांनी तपास केला. त्यावेळी त्या रुग्णालयात बेकायदा कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया होत असल्याचेही समोर आले आहे. सरकारी सेवेत काम करणाऱ्या या महिला डॉक्‍टर कामाच्या ठिकाणी कधी होत्या याचीही चौकशी करणे गरजेचे आहे.  

महिला आयोगाकडून ‘स्यू मोटो’ दखल 
सांगली- मिरज- कूपवाड शहर महापालिका कार्यक्षेत्रातील चौगुले हॉस्पिटल येथे झालेल्या बेकायदा गर्भपात प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे (स्यू मोटो) दखल घेतली असून, जिल्हा पोलिस अधीक्षक यांना सदर प्रकरणाचा तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल तत्काळ सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने गठीत केलेल्या ‘राज्य तपासणी व सनियंत्रण समिती’च्या अध्यक्षा आहेत. या प्रकरणी सांगली- मिरज- कुपवाड शहर महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांचा अहवाल आयोगास प्राप्त झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com