कारवाई करून दाखवाच; गाठ आमच्याशी 

कारवाई करून दाखवाच; गाठ आमच्याशी 

कोल्हापूर - अवैध वाहतुकीवर कारवाई करणारच, असा स्पष्ट इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार यांनी आज कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या शिष्टमंडळास दिला. या वेळी रिक्षा चालकांचे नेते चंद्रकांत भोसले यांनी कारवाई करून दाखवाच; गाठ आमच्याशी आहे, असा दमच देत चर्चा थांबवली. 

सकाळी वडाप चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे सर्व वडाप चालकांनी दुपारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन डॉ. पवार यांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या चर्चेत अधिकारी कारवाई करण्यावर ठाम राहिले, तर वडाप चालकही आक्रमक होत कारवाई कराच; आम्हीही बघून घेतो, या भूमिकेवर ठाम राहिले. 

परिवहन समिती सभापती नियाज खान, स्थायी समिती सभापती डॉ. नेजदार यांच्यासह नगरसेवकांनी काल (गुरुवारी) प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना भेटून वडाप बंद करण्याची मागणी केली होती. वडापमुळे केएमटीला तोटा होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर आज सकाळी सहापासून अधिकाऱ्यांकडून चार फ्लाईंग स्कॉडच्या माध्यमातून कारवाई सुरू झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या वडाप व रिक्षा चालकांनी दुपारी डॉ. पवार यांची भेट घेतली. या वेळी सुमारे दीडशे-दोनशे वडाप व रिक्षा चालक उपस्थित होते. येथे झालेल्या चर्चेत डॉ. पवार यांनी अवैध वाहतुकीवर कारवाई करणारच, असा ठेका कायम धरला; तर फक्त वडापवरच कारवाई नको, सर्वच अवैध वाहतुकीवर कारवाई करा, कोणाच्या दबावाखाली कारवाई करू नका, रिक्षाचालक आहेत, चोर नाहीत, असेही भोसले आणि राजू जाधव यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कोणताही तोडगा न निघता रिक्षाचालक निघून गेले. 

सुमारे अर्धा तास झालेल्या चर्चेत चंद्रकांत भोसले, राजू जाधव यांच्यासह शिष्टमंडळाने डॉ. पवार यांना निवेदन दिले. यामध्ये म्हटले आहे की, केएमटीचा भ्रष्ट कारभारच तोट्याला जबाबदार आहे. नवीन बस खरेदी, वाहन पार्टस्‌, टायर, इंधन खरेदीतील भ्रष्टाचार, ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी नसणारे मार्ग, जुन्या बसवर होणारा अवाढव्य खर्च अशी अनेक कारणे अधिकाऱ्यांना सांगितली. या वेळी राजू जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेत, वडाप करतोय, चोरी करीत नाही, आमचा धंदा सुरूच राहणार, असा दम दिला. यानंतरही डॉ. पवार यांनी अवैध वाहतुकीवर कारवाई केलीच जाईल, असे पुन्हा एकदा स्पष्ट केले. यानंतर चालकांनी सभागृहातच घोषणाबाजी सुरू केली. अखेर भोसले यांनी अनेक ठिकाणी केएमटी, एसटी बस जादा प्रवासी घेऊन जातात, त्यांच्यावर कारवाई करा, आमच्यावर एकतर्फी कारवाई करून दाखवाच; गाठ आमच्याशी आहे, असा सज्जड इशारा देत "जय महाराष्ट्र' म्हणून चर्चा थांबवली. 

चर्चेत भारत चव्हाण, युसूफखान पठाण, दिलीप सूर्यवंशी, शाम आवळे, शिवाजी पाटील, सुरेश मोरे, विजय जेधे, भास्कर भोसले, राजू बागवान, राजा कोरवी, महंमद बागवान, सूर्यकांत माळी, हारूण मुल्ला, अनिस सय्यद, साजीद खलील, साजीद बागवान, इम्रान मुल्ला, बाळासाहेब रुकडीकर, महबूब मुजावर, राजा बागवान, अनिल सुतार, नासीर सय्यद, युनूस शिकलगार यांचा सहभाग होता. 

अधिकाऱ्यांनी केले चित्रीकरण 
पोलिस बंदोबस्तात चर्चा करण्यात येत होती. या वेळी चालक आक्रमक होण्याची शक्‍यता होती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी संपूर्ण चर्चेचे चित्रीकरण स्वतःच्या मोबाइलवर केले. प्रत्येकाची भाषणे आणि डॉ. पवार यांची भूमिका, घोषणाबाजी या सर्वांचे त्यांनी चित्रीकरण केले. 

आरटीओमधील भ्रष्टाचार, केएमटीमधील भ्रष्टाचार, चेकपोस्टवरील भ्रष्टाचार, आरटीओतील एजंटगिरी या सर्वांवरही कारवाई झाली पाहिजे, ही आमची भूमिका राहणार आहे. आमच्या पोटावर कोण उठत असेल तर आम्ही शांत बसणार नाही. सर्वांचा भ्रष्टाचार जनतेसमोर आणणार आहोत. दमदाटी, हुकूमशाहीबाबत न्यायालयातही दाद मागण्यासाठी आम्ही कमी पडणार नाही. 
चंद्रकांत भोसले (महासंघाचे नेते) 

अवैध वाहतूक रोखणारच आहोत. काल केएमटीचे सभापती आणि नगरसेवक यांनी कारवाईबाबत आग्रह धरला. आज वडाप चालक म्हणतात, जादा प्रवासी घेणाऱ्या केएमटीवरही कारवाई करा. आम्ही नियमाप्रमाणे अवैध वाहतूक करणाऱ्यांवर वर्षभर कारवाई करीत असतो. अशीच कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे. याबाबत वस्तुस्थिती सांगणारा पत्रव्यवहार शासनाशीही करणार आहे. 
डॉ. डी. टी. पवार (प्रादेशिक परिवहन अधिकारी) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com