कऱ्हाड येथे मुस्लिम डेव्हलपमेंट सेंटरचे उद्धाटन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

जमियत ए उलमा हिंद संघटनेच्या मुस्लिम डेव्हलपमेंट सेंटरच्या प्रबोधन चळवळीत सहभागी व्हा, असे आवाहन जमियत ए उलमा राज्याचे अध्यक्ष मौलाना हाफीज नदीम सिद्दीकी यांनी केले. 

कऱ्हाड - धार्मिक शिक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाला अद्ययावत शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी येथे सुरू झालेल्या जमियत ए उलमा हिंद संघटनेच्या मुस्लिम डेव्हलपमेंट सेंटरच्या प्रबोधन चळवळीत सहभागी व्हा, असे आवाहन जमियत ए उलमा राज्याचे अध्यक्ष मौलाना हाफीज नदीम सिद्दीकी यांनी केले. 

आझाद मोहल्ला येथे मुस्लिम डेव्हलपमेंट सेंटर व जमिएत ए उलमा हिन्द कार्यालयाच्या उद्धाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. उपाध्यक्ष जमियत ए उलमा हिन्द मौलाना अमानुल्ला, दिनी तालीमी बोर्ड महाराष्ट्र उपाध्यक्ष मुफ्ती रफीक पोरकर, महाडच्या अंजुमने दर्दंमदाने तालीम व तरक्कीचे सचिव मुक्ती मुझफ्फर उपस्थित होते. मौलाना सिद्दीकी म्हणाले, जमियत ए उलमा हिंद सामाजिक संघटना आहे. मुस्लिम समाजाच्या सर्वांगिण विकासाकरीता व हक्क व न्याय मिळवून देशपातळीवर कार्यरत आहे. इस्लामी शिक्षणाबरोबरच उच्च शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. याकरीता घेतल्या जाणाऱ्या जनजागृती व प्रबोधन मोहिमेत सर्वांनी सामिल व्हावे.

मौलाना अमानुल्ला म्हणाले, देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची अत्यंत गरज आहे. मुस्लिम विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाबरोबर पवित्र कुराणचे उपदेश ध्यानात ठेवून देशसेवा केल्यास गरज पूर्ण होऊ शकते. मुप्ती मुझफ्फर यांनी जमियतच्या स्वातंत्र्यापूर्वी पासूनचे योगदानावर प्रकाश टाकला. मु्प्ती रफीक पोरकर यांनी युवकांना वाममार्ग व व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी उलमांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. जमियते उलमाचे सचिव इरफान सय्यद म्हणाले, मुस्लिम डेव्हलपमेंट सेंटरचे प्रमुख उद्देश मुस्लिम विद्यार्थ्यांची माहिती जमा करणे, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना करियर गाईडन्स देणे, एमपीएससी, युपीएससीच्या विद्यार्थ्यांना कोचिंग क्लास व लायब्ररीची सोय करून देणे आहे. गरीब गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता आर्थिक मदतदेखील सेंटरतर्फे करण्यात येणार आहे. शासकीय व खासगी स्कॉलरशिपची माहिती देणे, फॉर्म भरून देणे व पाठपुरावा करून स्कॉलरशिप मिळवून देणेचे काम सेंटरमार्फत केले जाईल. शासकीय नोकर भरती माहिती देणे व परीक्षेची तयारी करून घेणे हे देखील सेंटरचे उद्देश आहे. मौलाना युन्नूस यांनी सूत्रसंचालन केले. जमियते उलमाचे अध्यक्ष कारी फारुक यांनी आभार मानले. मुप्ती खालीद, मुप्ती इरफान, मौलाना अब्दुल रौफ, हाफीज जावेद, हाफीज आय्याज, हाफीज आमीन, हाफीज मोहसीन, कारी आसिफ व इतर उलमा सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Inauguration of the Muslim Development Center at Karhad