प्राप्तिकरात सूट हा दिलासा - गायकवाड

प्राप्तिकरात सूट हा दिलासा - गायकवाड

‘‘अर्थसंकल्प जाहीर झाला की त्यावरच सर्वसामान्यांचे ‘फॅमिली बजेट’ ठरते. आम्हा नोकरदारांना तर अगदी काटकोनात नियोजन करावे लागते. आज अर्थसंकल्प सादर झाला. अर्थसंकल्पातील घोषणांची माहिती आज आम्ही कुटुंबीयांनी एकत्रित बसून दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून घेतली. दर वाढल्यामुळे दैनंदिन जीवनामधून गायब झालेली डाळ स्वस्त होणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केले. त्यामुळे महागाई कमी होईल असे वाटते. प्राप्तिकरामध्ये दिलेली सूट हा मोठा दिलासादायक निर्णय आहे. या निर्णयामुळे नक्कीच नोकरदारांचे बजेट सावरण्यास मदत मिळणार आहे. ‘अच्छे दिन’चे जे स्वप्न दाखवलेले आहे, त्या दिशेने पाऊल पडले, असे म्हणायला काही हरकत नाही,’’ असे निरीक्षण नितीन गायकवाड यांनी नोंदवले.

ते म्हणाले, ‘‘आम्हा नोकरदार मंडळींना मासिक पगारातून घरखर्चाचे बजेट ठरवावे लागते. नोटबंदीनंतर खरोखरच अस्वस्थता होती; मात्र कॅशलेसच्या दिशेने टाकलेले पाऊल नक्कीच स्वागतार्ह आहे. कॅशलेसला प्रोत्साहन देण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न या अर्थसंकल्पात केलेला आहे. आम्हीही बहुतेक व्यवहार कॅशलेस करण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रारंभी काही प्रमाणात त्रास झाला; मात्र आता असे व्यवहारही सवयीचे बनलेले आहेत. व्यवहार करण्यासाठी केवळ कार्ड सोबत ठेवणे एवढीच काय ती जबाबदारी आता उरली आहे. याचे सर्वांनी स्वागत केल्यास पारदर्शी कारभार वाढण्यास मदतच मिळणार आहे. बहुतेक नोकरदार या पद्धतीने व्यवहार करताना दिसत आहेत. नेमके काय काय कमी झाले, हेच आमची आई अनुसया यांनी अर्थसंकल्प पाहताना विचारले. डाळ स्वस्त झाल्याचा आनंद तिला नक्कीच आहे. गर्भवती महिलांना सहा हजार रुपयांची करण्यात येणारी मदत ही उत्तम गोष्ट आहे, असे सांगत पत्नी सपनाने केंद्र सरकारचे अभिनंदन केले. छोटे व्यावसायिक आणि मध्यमवर्गावरील कराचे ओझे कमी केल्यामुळे या क्षेत्रामध्ये खरोखरच आनंददायी वातावरण आहे आणि ही समाधानाची बाब असल्याचे मत वडील निशिकांत यांनी नोंदवले.

रेल्वेचे आरक्षण ऑनलाइन करण्याची प्रक्रिया मोफत केल्याचा नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे आमचे पैसे वाचणार आहेत. ही बाब जरी छोटीशी वाटत असली तरी तिचा नेमका फायदा सर्वसामान्यांना मिळण्यास मदत होणार आहे. यातून वाचणारे पैसे घरामध्येच उपयोगी पडणार आहेत.

घरगुती गॅस, पेट्रोल, धान्य अशा जीवनावश्‍यक वस्तू आणखी स्वस्त होण्याची आवश्‍यकता आहे आणि ती स्वस्ताई टिकण्याचीही गरज आहे. तरच ‘अच्छे दिन’चे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल; अन्यथा कमी केल्याचे दाखवायचे आणि पुन्हा महिन्याभराने दरवाढ करायची असे झाल्यास सर्वसामान्यांचा भ्रमनिरास होऊ शकेल. जीवनावश्‍यक वस्तू जोपर्यंत स्वस्त होत नाहीत तोपर्यंत फॅमिली बजेटवर त्याचा प्रभाव दिसत नाही. व्यक्तिगत कुटुंब आणि नोकरदार म्हणून मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न काही प्रमाणात या अर्थसंकल्पात केल्याचे दिसत आहे. मासिक उत्पन्नात घर चालवताना अनेक गृहिणींची तारांबळ उडते. गुंतवणुकीसाठी काही शिल्लक राहते का, हा सर्वच गृहिणींचा अजेंडा असतो.’’

रेल्वेचे आरक्षण ऑनलाइन करण्याची प्रक्रिया मोफत केल्याचा नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे आमचे पैसे वाचणार आहेत. ही बाब जरी छोटीशी वाटत असली तरी तिचा नेमका फायदा सर्वसामान्यांना मिळण्यास मदत होणार आहे. यातून वाचणारे पैसे घरामध्येच उपयोगी पडणार आहेत.
- नितीन निशिकांत गायकवाड (नोकरदार)

दृष्टिक्षेपात
 डाळ स्वस्त केल्याचा नक्कीच घराच्या बजेटला हातभार
 ‘अच्छे दिन’च्या स्वप्नाच्या दिशेने पडले पाऊल
 कॅशलेस व्यवहारातून पारदर्शी व्यवहाराला प्राधान्य
 घरगुती गॅस, पेट्रोल, धान्य अशा जीवनावश्‍यक वस्तू आणखी स्वस्त होण्याची आवश्‍यकता आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com