माघारीसाठी अपक्षांचा वधारला भाव 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत बहुतांशी ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढती होत असल्यामुळे अपक्षांना रोखण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे अपक्षांचा भाव आता वधारू लागला आहे. 

कोल्हापूर - जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत बहुतांशी ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढती होत असल्यामुळे अपक्षांना रोखण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे अपक्षांचा भाव आता वधारू लागला आहे. 

जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुकीत यापूर्वी एकास एक अशी थेट लढत व्हायची. मुळात कॉंग्रेसच्या विरोधात उमेदवार नसायचा. भाजप किंवा शिवसेनेचा तेवढा प्रभाव ग्रामीण भागात नव्हता. कॉंग्रेसमधील नाराज शिवसेनेत जाऊ लागले. त्यामुळे उमेदवाराची संख्या वाढली. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर ग्रामीण भागात कॉंग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होऊ लागली. एखाद्या ठिकाणी तगड्या कार्यकर्त्याला उमेदवारी नाकारली, तर तो बंडखोरी करत असे. गेल्या विधानसभा निवडणुकीपासून झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील चित्र बदलू लागले. राज्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती सत्तेत आल्यानंतर भाजपने आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी इनकमिंग सुरू केले. यात दोन्ही कॉंग्रेसच्याच कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे यावेळच्या लढती तिरंगी, चौरंगी असल्यामुळे मतांची विभागणी होणार आहे. त्यातूनही काही ठिकाणी पक्षाने उमेदवारी नाकारली म्हणून बंडखोरी करण्याच्या इराद्याने काही कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. 

मतांची होणारी विभागणी टाळण्यासाठी आणि बेरजेचे राजकारण करण्यासाठी सध्या सर्वच पक्षांचे नेते आपापल्या बंडखोरांना शांत करण्याच्या प्रयत्नात आहेत. काही कार्यकर्ते पक्षात नाहीत; पण कार्यकर्ता म्हणून त्या भागात परिचित आहे. अशा कार्यकर्त्यांनीही काही ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत. 

भेटीगाठी वाढल्या 
एकाच गावातील दोन उमेदवार असतील तर त्या गावातील मतांची विभागणी होण्याची भीती शर्यतीतील उमेदवाराला अधिक आहे. त्यामुळे ही मतविभागणी टाळण्यासाठी माघार घेण्याकरिता त्या, त्या गावातील उमेदवार त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. माघारीपर्यंत अपक्षांचा निर्णय लावण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांची आणि उमेदवारांची देखील धडपड सुरू आहे. त्यामुळे अपक्ष म्हणून अर्ज भरणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगला भाव आला आहे. माघारीच्या दिवसापर्यंत अपक्षांचा भाव चांगलाच वधारणार आहे.