"इंद्रभुवन'ला फांद्यांचा विळखा; सागरकन्या भग्नावस्थेतच 

solapur
solapur

सोलापूर : गिरणगावचे वैभव आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या महापालिकेतील इंद्रभुवन इमारतीला अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्यांचा विळखा पडला आहे. धक्कादायक म्हणजे, 13 वर्षांपूर्वी वीज अंगावर झेललेली सागरकन्या अद्यापही भग्नावस्थेतच आहेत. ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी गांभीर्याने पाहणे गरजेचे असताना, महापालिका प्रशासनाचे दुरवस्थेबाबत "स्मार्ट' दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट होत आहे. 

या इमारतीची गणना हेरिटेज वास्तूमध्ये होते. सध्या या इमारतीमध्ये पूर्णपणे प्रशासकीय कारभार चालतो. अतिशय सुंदर कलाकुसर असलेल्या या इमारतीची देखभाल करणे आवश्‍यक होते. मात्र, तितक्‍या गांभीर्याने ते घेण्यात येत नाही. आयुक्त कार्यालयाचा परिसर बंदिस्त करणे आणि पायऱ्यावरील मॅट वारंवार बदलण्याचे काम जितक्‍या तत्परतेने केले गेले, त्याचप्रमाणे या सर्वांगसुंदर इमारतीच्या देखभालीसाठीही प्रयत्न व्हावेत, अशी सामान्य सोलापूरकरांची मागणी आहे. 

सध्या या इमारतीचे कौलारू पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यांचे मजबुतीकरण करणे आवश्‍यक आहे. अन्यथा एखादा मोठा पाऊस झाला तर कोणत्याही क्षणी कौलारू खाली पडू शकतात, त्यामुळे इमारतीलाही क्षती पोचू शकते. इमारतीवर जागोजागी विविध झाडांच्या फांद्या उगवल्या आहेत. त्या वेळोवेळी काढणे आवश्‍यक आहे. धोकादायक स्थितीतील कौलारू आणि उगवलेल्या फांद्या येता-जाता सर्वजण पाहतात, मात्र त्याबाबत कोणीच गांभीर्याने घेत नाही. या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. एखादी मोठी दुर्घटना झाल्यावरच पालिका प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

भग्नावस्थेतील 13 वर्षे 
सुमारे 13 वर्षांपूर्वी 29 ऑगस्ट 2005 रोजी झालेल्या मुसळधार पावसात "इंद्रभुवन'वर वीज कोसळली. सागरकन्या व सुरक्षारक्षकाच्या मूर्तींसह विजेपासून रक्षण करण्यासाठी इमारतीवर लावलेला पंचधातूचा कलशही तुटला. या कलशाला चार टोकदार बाजू होत्या. विजेच्या धक्‍क्‍याने दोन बाजू पूर्णपणे; तर एक बाजू अर्धवट वितळली. वीज कोसळल्यामुळे इमारतीवरील एका बाजूच्या मूर्ती तुटून पडल्या. कलाकुसरीचा उत्कृष्ट नमुना असलेली इंद्रभुवनची इमारत पुण्यश्‍लोक अप्पासाहेब वारद यांनी 1907 मध्ये बांधली. नव्याने बांधलेल्या कौन्सिल हॉलपेक्षाही ही इमारत अद्याप मजबूत आहे. वीज कोसळल्यामुळे 98 वर्षांत पहिल्यांदाच या इमारतीला काही प्रमाणात क्षती पोचली. मात्र त्यानंतरही या इमारतीकडे दुर्लक्षच झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com