परस्पर नात्याची नाळ आजही घट्ट

सुधाकर काशीद
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - आमच्या वाडीतल्या देसायांच्या घरात दोन-तीन वर्षाला लग्न, बारसं, जाऊळ ठरलेलं. त्यावेळी त्यांच्याकडे बॅंड वाजवायला आमच्या पणजोबापासून आम्हीच. बॅंड वाजवायला दहा जणांचा पुठ्ठा घेऊन जायला लागायचे. एकजण कमी दिसला तर देसाई काका खवळायचे. जाताना मात्र भरपूर बिदागी आणि जेवायला पहिल्या पंगतीला बसवायचे. ते मराठा; पण आम्हा कोरवी समाजाला कधी परकं मानलंच नाही... कोरवी समाजाचे कुंडलिक माने भरभरून बोलत होते. मराठा क्रांती मोर्चाच्या दसरा चौक कार्यालयात आज लगीनघाईचे वातावरण होते आणि अख्ख्या कोल्हापुरातल्या सर्व जाती-धर्माचे कोण ना कोण आपापसात गप्पा मारत बसल्यामुळे सारे कार्यालय भरून गेले होते.

कोल्हापूर - आमच्या वाडीतल्या देसायांच्या घरात दोन-तीन वर्षाला लग्न, बारसं, जाऊळ ठरलेलं. त्यावेळी त्यांच्याकडे बॅंड वाजवायला आमच्या पणजोबापासून आम्हीच. बॅंड वाजवायला दहा जणांचा पुठ्ठा घेऊन जायला लागायचे. एकजण कमी दिसला तर देसाई काका खवळायचे. जाताना मात्र भरपूर बिदागी आणि जेवायला पहिल्या पंगतीला बसवायचे. ते मराठा; पण आम्हा कोरवी समाजाला कधी परकं मानलंच नाही... कोरवी समाजाचे कुंडलिक माने भरभरून बोलत होते. मराठा क्रांती मोर्चाच्या दसरा चौक कार्यालयात आज लगीनघाईचे वातावरण होते आणि अख्ख्या कोल्हापुरातल्या सर्व जाती-धर्माचे कोण ना कोण आपापसात गप्पा मारत बसल्यामुळे सारे कार्यालय भरून गेले होते. राखीव जागांची मागणी मराठा समाजाची; पण इतर सगळे जणच मराठ्यांइतकेच पोटतिडकीने आपल्या मनातील भावना व्यक्त करत होते.

इथे आज महात कुटुंबातला फारूक त्यांच्या पुतण्यासोबत आला होता. महात कुटुंबानं कोल्हापुरातले हत्ती सांभाळलेले. त्यामुळे त्यांचा तर सरदार, जहागीरदार, मराठा कुटुंबाशी संबंध. हे फारूक ७० वर्षांचे; पण आम्ही हत्तीला सांभाळलं आणि आम्हाला अमूक सरकारांनी कसं जीवापाड सांभाळलं, 

हे भरभरून सांगत होते. मराठ्यांच्या मटणाची हौस कशी हे सांगताना मराठ्याची ठराविक घराणी आणि खाटिक समाजाची घराणी यांचे आजोबा, पणजोबापासूनचे नाते कसे जपले, याचे वर्णन खाटिक समाजाचा विजय करत होता. एखाद्या कारणाने आपल्या दुकानात मटण शिल्लक नसेल तर त्या दिवशी मटणाचा बेत रद्द; पण अनेकजण दुसरीकडे मटण घेणार नाहीत एवढा विश्‍वास कसा आहे आणि एखाद्या दिवशी मटण खराब लागलं तर दुसऱ्या दिवशी कसं खरमरीत बोलून घ्यावं लागतं, हे उदाहरणासह सांगत होता.

आजही आपल्या घरात कसलाही समारंभ असो, शेजारच्या सूर्यवंशी वहिनी अगोदर येऊन काय हवं, काय नको याची चौकशी करतात. जाताना हजार, बाराशे रुपये बायकोच्या हातात कशा देऊन जातात आणि आम्ही नवरा-बायको भांडत असलो आणि त्यांनी ‘आवाज’ दिला तर आमचे भांडण कसे थांबते, हे दुर्गुळे काका सांगताना अख्खे कार्यालय कौतुकाने ऐकत होते.
दसरा चौकातल्या कार्यालयातल्या या गप्पा-टप्पांमुळे मराठा समाज आणि इथला बहुजन समाज यांच्यातले पिढ्यान्‌ पिढ्याचे नातेच व्यक्त होत होते. या गप्पा-टप्पा म्हणजे काही भाषण नव्हते. अमूक एका मुद्यावरच बोलले पाहिजे, असे ठरले नव्हते; पण उपस्थितांतील वेगवेगळ्या व्यक्ती भरभरून बोलत होत्या. आरक्षण कसे दिले जाते, त्याची टक्केवारी काय, असला कसलाही मुद्दा त्यांच्या बोलण्यात नव्हता; पण मराठा समाजाची मागणी योग्य आहे, त्यांच्या पाठीशी आपण उभे राहिलेच पाहिजे, हाच भाव तीव्रपणे व्यक्त होत होता.

अर्थात या वातावरणाला पोषक अशीच कोल्हापूरची वाटचाल आहे. मूळ कोल्हापूरची परस्पर नात्याची नाळ जशीच्या तशी आहे. किंबहुना त्यामुळेच आज मराठा क्रांती मोर्चा केवळ मराठ्यांचा न राहता तो इतर सर्व घटकांनीच उचलून धरला आहे.

कोल्हापूर आजही नाती जपत आपलं गावपण टिकवून आहे. अजूनही वेगवेगळ्या जाती-धर्माचा शेजार आहे. गल्लीत ठराविक जातींच्या लोकांची संख्या जरूर इतरांपेक्षा अधिक; पण कमी संख्या असलेली इतर जातींची घरेही वेगळेपण टिकवून आहेत. गल्ली-बोळात अपार्टमेंट डोकावू लागल्या असल्या तरी गल्लीतल्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंतची नाती अजूनही गुंतलेली आहेत. इदला गल्लीत सर्वांना देण्यासाठी मुस्लिम बांधवांनी पातेलं भरून खिर करण्याची पद्धत आहे. ज्यांचे गुऱ्हाळ त्यांनी शेजाऱ्या-पाजाऱ्यांना गुळाची छोटी ढेप देण्याची प्रथा आहे.

समाजजीवनाचा मराठा अविभाज्य भाग
गल्लीतल्या सर्व पोरा-टोरांना वर्षातून एकदा ट्रकमधून विशाळगड, गणपतीपुळेला घेऊन जाण्याचा प्रघात अनेक ट्रकमालकांनी पाळला आहे. गल्लीत नव्हे, तर आसपासच्या चार-पाच गल्लीत काही बरे-वाईट घडल्यास पन्नासभर तरी हातातले काम टाकून धावून जाणार, हे तर ठरलेलेच आहे. दरवर्षी टेंबलाबाई, ताईबाईची जत्रा म्हणजे सहभोजनाचाच रांगडा प्रकार आहे. असल्या सगळ्या वातावरणात कोल्हापुरातला मराठा समाज इथल्या समाजजीवनाचा एक अविभाज्य घटक बनून राहिला आहे. बहुजन समाजाला बरोबर घेऊनच त्यांचा सारा प्रवास राहिला. मराठा क्रांती मोर्चा पूर्वतयारीच्या निमित्ताने ही परस्पर नात्याची नाळ अजूनही किती घट्ट आहे, याची सर्वांना जाणीव झाली.

Web Title: Interactive relationship umbilical cord still tight