दहशत झुगारून बेळगावात मराठी झंझावात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

बेळगाव - महामेळाव्यास याल तर कारवाई करू, असे फोन करून मराठी युवकांना धमकी देणाऱ्या पोलिसांची दहशत, परवानगी देण्यास टाळाटाळ करून लोकांत संभ्रमावस्था निर्माण करण्याचा खटाटोप, या सर्वांवर मात करत सीमावासीयांनी मोठ्या संख्येने महामेळाव्यास उपस्थिती लावली. मराठी भाषक शेवटच्या श्‍वासापर्यंत ही लढाई लढत राहील, असा जणू इशाराच कर्नाटकी प्रशासनाला दिला. संयुक्‍त महाराष्ट्राच्या घोषणांनी पुन्हा व्हॅक्‍सिन डेपो मैदान दणाणले.

काळ्या दिनाच्या फेरीनंतर पोलिसांनी मराठी लोकांत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अनेक मराठी युवकांना अटक केली. काहींवर राजद्रोहासारखे गंभीर गुन्हे नोंद केले. फेरीतील हजारो मराठी युवकांच्या उपस्थितीने कर्नाटक शासनाच्या पायाखालची वाळू सरकली होती. त्यामुळे युवकांची धरपकड करून मारहाणीने दहशत निर्माण करण्याचे काम पोलिसांनी बजावले होते. रॅलीतील सहभागाची धास्ती घेऊन पोलिसांनी रविवारी (ता. 20) रात्री अकरा वाजेपर्यंत परवानगीच दिली नाही; पण समितीच्या नेत्यांनीही चिकाटीने याचा पाठपुरावा करत परवानगी मिळवलीच. महामेळावा यशस्वी होऊ नये म्हणून प्रशासनाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. महामेळाव्याचा निरोप लोकांपर्यंत जाऊ नये, युवकांनी येऊ नये यासाठी दबावतंत्र वापरले.

पोलिसांनी अनेक युवकांना फोन केले. घरी जाऊन "मेळाव्यास याल तर कारवाई करू' असे संदेश पोचवले. इतकेच नाही तर व्हॅक्‍सिन डेपोकडे येणाऱ्या सर्व लहान-मोठ्या रस्त्यांवर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. प्रत्येक कोपऱ्यावर पोलिस जीप आणि सशस्त्र पोलिस बंदोबस्त उभा करून दहशत कायम ठेवण्याचा प्रयत्न केला; पण गेल्या दहा-बारा वर्षांची परंपरा कायम राखत सीमावासीयांनी महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून लढ्याला पाठबळच दिले.

ऐन सुगीतही सहभाग...
पोलिसी दंडुकेशाहीच्या जोरावर महामेळावा यशस्वी होऊ नये, यासाठी प्रशासनाने चंग बांधला होता; पण लोकशाही मार्गाने चाललेल्या या लढ्याला हा प्रकार नवा नव्हता. त्यामुळे ऐन सुगीच्या हंगामातही ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने लोकांनी महामेळाव्यात सहभाग नोंदविला. पोलिसांनी मैदानावर मोठा मंडप घालण्यास परवानगी नाकारली; पण मिळेल त्या ठिकाणी बसून लोकांनी हा मेळावा यशस्वी करून दाखविला.

Web Title: Intimidation disregard Marathi thunderstorms in belgav