प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

इस्लामपूर - पतीच्या अपहरणाचा बनाव करणाऱ्या घोगाव (ता. पलूस) येथील अंजना निवृत्ती  शिंदे (वय ४०) हिनेच पती निवृत्ती शिंदे याचा प्रियकर व त्याच्या मित्राच्या मदतीने खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

इस्लामपूर पोलिसांनी या प्रकरणी प्रियकर विकास सर्जेराव माळी (वय ४२), त्याचा मित्र राजेंद्र हिंदूराव कांबळे (वय ५०, सर्व रा. घोगाव) व अंजना शिंदे यांना गजाआड केले. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या निवृत्तीला कायमचा संपवण्यासाठी  त्यांनी कट केल्याचे उघड झाले. 

मृत निवृत्ती गोविंद शिंदे (वय ५०) यांचे लहान भाऊ शरद यांनी शिराळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस उपाधीक्षक किशोर काळे व पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिलेली माहिती अशी ः अंजना शिंदे व विकास माळी  यांचे वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. त्याची कुणकुण निवृत्ती शिंदे यांना लागली. सहा महिन्यांपासून त्यांच्यात वाद होत होता. त्याला कंटाळून व आपल्या प्रेमातील पतीचा अडसर कायमचा दूर करण्यासाठी अंजना व विकास माळी यांनी कट रचला. त्यानुसार शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अंजनाने पती निवृत्ती यांना चहातून नशेच्या गोळ्या दिल्या. रात्री आठच्या सुमारास ‘माझा कान दुखतोय, इस्लामपूरला दवाखान्यात जाऊ या’ असा बनाव केला. पत्नीच्या म्हणण्यानुसार निवृत्ती व अंजना दोघेजण दुचाकीवरून इस्लामपूरला यायला निघाले. तोपर्यंत निवृत्ती यांना गुंगी आली होती. दुचाकीवरून दोघेजण बोरगाव येथील शिंदे मळ्याजवळून येत असताना दुचाकीने एका अज्ञात वाहनाला धडकली. निवृत्ती यांच्या पायाला व शरीराला जखमा झाल्या. ज्या वाहनाला त्यांची दुचाकी धडकली त्यांनी निवृत्ती यांना इस्लामपूरला आणले. न्यायालयाजवळ रस्त्यावर सोडले. त्याच वेळी अंजनाने प्रियकर विकासला या बाबतची कल्पना दिली होती. तो कटानुसार पाठीमागून त्याचा मित्र राजेंद्र कांबळे याच्या बरोबर दुचाकीवरून आला. दवाखान्यात जाऊया, असे म्हणून जखमी निवृत्ती यांना गाडीवर घालत चौघेजण निघाले. गाडी शिराळ्याच्या दिशेने गेली. पावलेवाडी खिंडीत गाडी गेल्यानंतर रस्त्यापासून तीस फुटांवर आत जात त्यांनी निवृत्ती यांना खाली पाडले. कीटकनाशकाची बाटली निवृत्ती यांच्या तोंडात ओतली. तोंडाला फेस आल्यानंतर ते निपचीप पडले. १५ ते २० मिनिटांनी परत रस्त्यावर गाडीजवळ आल्यानंतर अंजनाने तो खरोखर मेलाय का याची खात्री परत एकदा करा, असे विकास व राजेंद्रला सांगितले. त्यानुसार परत तिघे निवृत्ती यांच्याजवळ गेले. विकासने निवृत्ती यांच्या गळ्यावर पाय ठेवून दाबला. मृत  झाल्याची खात्री झाल्यानंतर सर्वजण परत इस्लामपूरला आले. अंजनाला उपजिल्हा रुग्णालयाजवळ सोडले.

रात्री साडेअकराच्या सुमारास अंजनाने उपजिल्हा रुग्णालयात जाऊन पतीचा अपघात झाला आहे. त्यांना रुग्णालयात आणले का अशी चौकशी केली. त्यानंतर ती इस्लामपूर पोलिस ठाण्यात आली. पतीचे अज्ञातांनी अपहरण केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना अंजनाचे बोलणे संशयास्पद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर चौकशी करा, आम्हीही करतो असे सांगितले. दुसऱ्या दिवशी अंजनासह सर्व नातेवाईक परत एकदा इस्लामपूर पोलिस ठाण्यात आले. 

दरम्यान, पावलेवाडी खिंडीत अज्ञाताचा मृतदेह सापडल्याची माहिती इस्लामपूर पोलिसांना मिळाली.  त्यांनी मृत निवृत्ती यांचा भाऊ शरद यांना घेत खात्री करण्यासाठी त्या ठिकाणी गेले. तो मृतदेह निवृत्ती यांचा असल्याचे निष्पन्न झाले. या दरम्यान हवालदार दीपक पाटील व जितेंद्र थोरात या दोघांनी खबऱ्यामार्फत घोगाव येथून माहिती मिळवली होती. त्यानुसार त्या महिलेला व विकास माळी यांना ताब्यात घेत पोलिसी खाक्‍या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली. अंजना, विकास व राजेंद्र या तिघा संशयितांना ताब्यात घेतले. शिराळा पोलिस ठाण्यात तिघांच्यावर संगनमत करून  खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिराळा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप वाईकर तपास करीत आहेत.

माळकरी अंजना व फिल्मीस्टाईल कट
अंजना शिंदे माळकरी आहे. तिला विवाहित मुलगी व नववीमध्ये शिकणारा मुलगा आहे. पती निवृत्ती किर्लोस्करवाडी येथे कंपनीत कामाला होते. त्यांचा प्रेमात अडसर ठरू लागल्याने काटा काढण्यासाठी तिने पद्धतशीर प्रियकर विकासच्या मदतीने कट रचला. फिल्मी स्टाईलने एक स्टोरी तयार करत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; मात्र स्वतःच ती जाळ्यात प्रियकरासह ती अलगद सापडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com