इस्‍लामपुरात नऊ कार्यकर्त्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

‘बळीराजा’च्‍या कार्यकर्त्यांवर कारवाई; सदाभाऊंच्या बंगल्याला पोलिस छावणीचे स्वरूप

इस्लामपूर - शेतकरी संपाच्या पार्श्‍वभूमीवर आज शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी लोकप्रतिनिधींच्या घराला टाळे ठोकणार, असा इशारा दिला होता. याची धास्ती घेऊन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपूर येथील प्रशासकीय इमारतीशेजारील बंगल्याला आज पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान, आंदोलन करणारे बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बी. जी. पाटील यांच्यासह नऊ कार्यकर्त्यांना इस्लामपूर पोलिसांनी आज अटक केली.

आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मंत्री सदाभाऊ खोत यांच्या बंगल्यासमोर राज्य राखीव पोलिस दल, सांगली पोलिस दल अशा दोन तुकड्यांसह सुमारे साठ लोकांचा कडक पोलिस बंदोबस्त बंगल्याभोवती तैनात करण्यात आला आहे. सायंकाळी चारच्या सुमारास बस स्थानक परिसरात आंदोलन करणारे बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील यांच्यासह नऊ कार्यकर्त्यांना इस्लामपूर पोलिसांनी अटक केली. कडक पोलिस बंदोबस्त असल्याने सदाभाऊंच्या बंगल्याकडे आंदोलनकर्त्यांना फिरकता आले नाही; तर सदाभाऊ यांनी भाड्याने घेतलेल्या युसुफ सावकार कॉलनीतील बंगल्यावरही मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वास्तविक लोकप्रतिनिधी म्हणून माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या बंगल्यावर कोणताही कार्यकर्ता फिरकला नाही. त्याऐवजी स्वाभिमानीतून राज्य सरकारची पाठराखण करणारे सदाभाऊ हे शेतकरी व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचे लक्ष ठरले आहेत. ज्यांच्या खांद्याला खांदा लावून सदाभाऊंनी आंदोलने केली, तेच कार्यकर्ते आज सदाभाऊंच्या नावाने जागोजागी घोषणाबाजी करताना दिसत होते. कोणताही अनुचित प्रकार न होता घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी आज ताब्यात घेतले.

शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा, आदी मागण्यांचे निवेदन भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वाळवा तालुका शाखेने तहसीलदारांना दिले. या वेळी निवृत्त प्राचार्य विश्‍वास सायनाकर, प्रा. एल. डी. पाटील, सुभाष पाटील, रावसाहेब पाटील, भाई सागर रणदिवे आदी उपस्थित होते.