पुण्यातील युवकाच्या खूनप्रकरणी सुरूलच्या आरोपीस जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

इस्लामपूर - पुणे येथील एडवीन ऑगस्टीन स्वामी (वय 15, कोंडवा, पुणे) याचा पूर्व वैमनस्यातून सुरुल (ता. वाळवा) येथे आणून खून केल्याप्रकरणी आरोपी गणेश हंबीरराव गायकवाड (वय 29, रा. सुरुल, ता. वाळवा) याला आज जन्मठेपेची शिक्षा ठोठाविण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी हा निकाल दिला.

इस्लामपूर - पुणे येथील एडवीन ऑगस्टीन स्वामी (वय 15, कोंडवा, पुणे) याचा पूर्व वैमनस्यातून सुरुल (ता. वाळवा) येथे आणून खून केल्याप्रकरणी आरोपी गणेश हंबीरराव गायकवाड (वय 29, रा. सुरुल, ता. वाळवा) याला आज जन्मठेपेची शिक्षा ठोठाविण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी हा निकाल दिला.

याबाबत माहिती अशी - स्वामी व गायकवाड पुणे महापालिकेच्या शिवगार्डन मागील स्वीमिंग पूलमध्ये पोहायला जात होते. तेथे दोघांची ओळख झाली. त्यातून गणेश नेहमी एडवीनच्या घरी जात होता. गणेशने 5 मार्च 2013 ला एडवीनच्या घरी गेल्यानंतर "आमच्या सुरुल गावची 10 मार्च 2013 ला यात्रा आहे. आपण यात्रेला जाऊया ' असे म्हणाला. दोघे 10 मार्चला यात्रेसाठी गावाकडे आले. गावाकडे आल्यानंतर दोघे दारू प्यायले; तेव्हा पूर्वी एडवीनच्या पुण्यातील मित्रांनी गणेशला मारल्याची आठवण जागी झाली. त्याच रागातून रात्री दहाच्या सुमारास गणेशने एडवीनच्या डोक्‍यात काठी मारली. तो मृत झाल्यानंतर मृतदेह विहिरीत टाकला. त्यानंतर एडवीनच्या नातेवाइकांनी तो घरी आला नाही म्हणून गणेशचा भाऊ बंडा गायकवाड याला गावाकडे सुरुलमध्ये फोन केला. तेव्हा एडवीन यात्रेला आला होता आणि परत गेला, असे सांगितले. त्यामुळे चौकशीसाठी त्याचे नातेवाईक सुरुलला पोचले. तेव्हा गणेश दारू प्यायलेला दिसला. त्याच्याकडे एडवीनबाबत चौकशी केली असता त्याने पूर्ववैमनस्यातून खून केल्याचे सांगितले.

एडवीनच्या खुनाबद्दल त्याचे आजोबा सॅमसन डोरा स्वामी (रा. शालिनी व्हीला फ्लॅट नानक सोसायटी, कोंडवा-पुणे) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. इस्लामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून गणेशला अटक केली. त्याच्याविरुद्ध इस्लामपूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

न्यायाधीश श्रीमती होरे यांनी आरोपी गणेशला जन्मठेप व 10 हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास सहा महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली. सरकारी वकील मकरंद ग्रामोपाध्ये यांनी खून खटल्यात एकूण 20 साक्षीदार तपासले. तत्कालीन नायब तहसीलदार अरुण निकम, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी, सहायक पोलिस निरीक्षक बी. डी. ढेरे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.