आता उसाच्या दुसऱ्या हप्त्याचा लढा - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

इस्लामपूर - शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून लढा दिल्याने सरकारला कर्जमाफी द्यावी लागली. आता उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठीचा लढा सुरू केला जाईल, अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

इस्लामपूर - शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून लढा दिल्याने सरकारला कर्जमाफी द्यावी लागली. आता उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठीचा लढा सुरू केला जाईल, अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

कर्जमाफीच्या पार्श्‍वभूमीवर वाळवा तालुक्‍यात त्यांचे आज स्वागत झाले. इस्लामपुरात मिरवणूक निघाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त ते बोलत होते. ते म्हणाले, 'शेतकरी संप, आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या उसाचा दुसरा हप्ता मागणीकडे थोडेसे दुर्लक्ष झाले. आता या विषयाकडे लक्ष केंद्रित करणार आहे. काही कारखानदारांनी मनासारखा दर दिला आहे; ज्यांनी नाही त्यांची साखर कशी अडवायची ते बघू.''

ते म्हणाले, 'कर्जमाफी मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या संपाची धास्ती सरकारने घेतली. सरसकट कर्जमाफीसाठी आम्ही ठाम होतो; मात्र अनेक बडे उद्योजक, राजकीय नेते, बिल्डर, ठेकेदार, मोठ्या पगाराचे नोकरदार यांच्या नावे मोठी कर्जे आहेत. जो खरा शेतकरी आहे, त्याला कर्जमाफीचा लाभ मिळावा, यासाठी तत्त्वतः कर्जमाफीला मान्यता दिली आहे. गोरगरीब शेतकऱ्यांना कर्जमाफीची भूमिका योग्यच आहे.''

स्वामिनाथनसाठी देशव्यापी लढाई
शेट्टी म्हणाले, 'स्वाभिमानीने शुक्रवारी (16 जून) दिल्लीत देशातील शेतकरी नेत्यांची बैठक बोलावली आहे. स्वामिनाथन आयोगासाठीची लढाई देशव्यापी करू. एका राज्यातील आंदोलनाने केंद्रावर फारसा प्रभाव पडत नाही. महाराष्ट्रातील आंदोलनाची धग मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियानापर्यंत पोचली आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणातील लोक माझ्या संपर्कात आहेत. सर्वांचा दबाव गट केला जाईल.''