सातारा भाजपला नाराजीचे ग्रहण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

चंद्रकांत पाटील यांच्या ‘आधारा’ची अपेक्षा; शिवसेनेकडे मार्गक्रमण?

सातारा - पालिका पाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समित्यांत ‘कमळ’ फुलविणाऱ्या भाजपला सातारा शहर, तालुक्‍यात नाराजीचे ग्रहण लागले आहे. ‘आयारामां’ची उठाठेव, सोय करण्यात भाजपचे वरिष्ठ गुंतल्याने निष्ठावानांवर अन्याय होत असल्याची तक्रार करत शहर व तालुक्‍यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते नाराजीचा सूर आळवू लागले आहेत. मात्र, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाराजी दूर करण्याची अपेक्षाही त्यांना लागून राहिली आहे. 

भारतीय जनता पक्षाने महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांत यश मिळवून राज्यामध्ये सर्वात मोठा यशस्वी पक्ष ठरला आहे. मात्र, हे करताना ‘आयारामां’ची ताकद भाजपला यशापर्यंत घेऊन गेल्याचेही स्पष्ट झाले. सातारा जिल्हा परिषदेत यश मिळविताना ‘राष्ट्रवादी’तून आयात झालेल्या बहुतेक चेहऱ्यांना हे यश मिळाले आहे. जिल्ह्यातील आठ पालिकांच्या निवडणुकीतही यासारखी परिस्थिती दिसून आली. ‘आयारामां’नी भाजपमध्ये प्रवेश करून अनेक साध्ये साध्य करणे सुरू ठेवले आहे.

जनमाणसांत त्यांना ‘किंमत’ असल्याने पक्षातील वरिष्ठही त्यांनाच ‘किंमत’ देत आहेत. 

निवडणुकीत ‘कोअर टीम’ बनवितानाही ‘आयारामां’ची दखल घेण्यात आली. ते सांगतील त्यानुसार उमेदवारीही देण्यात आल्याचे शल्य आता ‘आंदोलक’ कार्यकर्त्यांना भासू लागले आहे. भाजप सत्तेत नसताना प्रवाहाविरोधात पोहत आंदोलन केले. पक्षाची बूथनिहाय बांधणी केली. मात्र, आता वाहत्या पाण्यात हात धुणाऱ्या ‘आयारामां’ना पक्षाकडून ‘मान’ मिळत आहे. सातारा शहर, तालुका कार्यकारिणी, भाजप युवा मोर्चातील अनेक जुन्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना शाबासकीची थाप मिळत नसल्याची सल बोचत आहे. पक्ष ‘ताकद’ देत नसल्याचा सूरही आळविला जात आहे. मंत्री पाटील यांनी शहर व तालुक्‍याच्या राजकारणात लक्ष घालून हे थांबविण्याची इच्छाही नाराजांकडून व्यक्‍त होत आहे.
 
शिवसेनेच्या संपर्कात
सातारा शहराध्यक्ष सुनील काळेकर यांच्यासह भाजपमधील काही पदाधिकारी, कार्यकर्ते कोल्हापूर येथे राजेश क्षीरसागर यांच्या घरगुती समारंभास उपस्थित राहिले होते. त्या प्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही त्यांनी भेट घेतली. एव्हाना शिवसेनेतील पदाधिकारीही त्यांना सेनेत घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

निष्ठावान कार्यकर्त्यांना शाब्बासकीच्या थापेची आवश्‍यकता असते; पण आता आमचा पक्षात मानसन्मान राखला जात नाही. माझ्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्‍वास घेतले जात नाही. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साताऱ्यात लक्ष घालावे. अन्यथा वेगळा विचार करू.
- सुनील काळेकर, सातारा शहराध्यक्ष, भाजप