समस्यांच्या गर्तेत गुऱ्हाळघरांना घरघर

समस्यांच्या गर्तेत गुऱ्हाळघरांना घरघर

कऱ्हाड - पश्‍चिम महाराष्ट्रातील गुळाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कऱ्हाडच्या बाजार समितीत गुळाची आवक दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. साखर कारखान्यांकडून उसाला मिळणारा चांगला दर, गुऱ्हाळघरांची कमी होणारी संख्या, मजुरांची वानवा, एकरी गुळाला मिळणारा उतारा आदी समस्यांच्या गर्तेत गूळ व्यवसाय अडकला आहे. त्यामुळे गुळाचे माहेरघर ही कऱ्हाडची ओळख आता काळाच्या ओघात पुसू लागली आहे. 

कऱ्हाडला कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांच्या बरोबरीने गुळाची आवक होते. गेल्या काही वर्षांत कर्नाटक राज्यातील गूळही कऱ्हाडच्या बाजार समितीत विक्रीसाठी आणला जाऊ लागला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून गुळाच्या बाबतीत कऱ्हाड बाजार समितीचा दबदबा कायम होता. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांपासून बाजार समितीत गुळाची आवक मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागली आहे. 

गुऱ्हाळे कमी होण्याची कारणे 
 उसाला कारखान्यांच्या चांगल्या दराने शेतकऱ्यांची गुऱ्हाळाकडे पाठ 
 मजुरांच्या समस्येने गुऱ्हाळघरांची संख्या कमी 
 गुऱ्हाळ मालकांचे मजुरांकडे अडकले लाखो रुपये 
 उसाच्या एकरी उत्पादनाचा तोटा शेतकऱ्यांच्या अंगावर 
 कष्ट करण्याची प्रवृत्ती झाली कमी

...अशी झाली आवक कमी 
वर्ष                 गुळाची आवक (क्‍विंटलमध्ये)          सरासरी दर 
२०१४-१५       एक लाख ८८ हजार ५२३               २८०० (रुपये)
२०१५-१६       एक लाख ७० हजार ६३८                २६०० (रुपये)
२०१६-१७       ९८ हजार ७८२ क्विंटल                  ३४००  (रुपये)

उसाचे गुऱ्हाळ करण्यासाठी शेतकऱ्यांना थोडे कष्ट पडते. मात्र, अलीकडे शेतकरी पहिल्यासारखे कष्ट करत नाहीत. त्यातच कारखान्यांकडूनही उसाला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी उसाचे गुऱ्हाळ करण्याचे कमी केले आहे. मजुरांच्या समस्येमुळे गुऱ्हाळांचीही संख्या कमी झाली आहे.
- प्रकाश पाटील , प्रतिनिधी, गुऱ्हाळ मालक संघटना 

कऱ्हाड बाजार समिती ही पश्‍चिम महाराष्ट्रात गुळाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांपासून गुळाची आवक कमी होत आहे. त्याला अनेक कारणे आहेत. मात्र, त्यामुळे उलाढालीवर आणि व्यापारावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.
- बी. डी. निंबाळकर सचिव, बाजार समिती, कऱ्हाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com