जलयुक्त ‘आर्वी’चा महिलांकडून निर्धार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

श्रमदानातून जलसंधारणाद्वारे पुन्‍हा फुलणार ‘पानमळ्याचे गाव’ 

सातारा - आर्वी (ता. कोरेगाव) येथे सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का व्यासपीठाच्या पुढाकाराने आज जलसंधारणाच्या चळवळीस प्रारंभ झाला. चळवळीतून श्रमदानाद्वारे गाव जलयुक्त करून आर्वीला पुन्हा एकदा ‘पानमळ्याचे गाव’ ही बिरूदावली मिळवून देण्याचा निर्धारही करण्यात आला.

श्रमदानातून जलसंधारणाद्वारे पुन्‍हा फुलणार ‘पानमळ्याचे गाव’ 

सातारा - आर्वी (ता. कोरेगाव) येथे सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का व्यासपीठाच्या पुढाकाराने आज जलसंधारणाच्या चळवळीस प्रारंभ झाला. चळवळीतून श्रमदानाद्वारे गाव जलयुक्त करून आर्वीला पुन्हा एकदा ‘पानमळ्याचे गाव’ ही बिरूदावली मिळवून देण्याचा निर्धारही करण्यात आला.

कोरेगाव तालुक्‍याच्या दक्षिण टोकावर नागझरी आणि त्याला लागून आर्वी हे मोठे गाव आहे. पूर्वी गावात शेकडो एकरात पानमळे असायचे. मात्र, गेल्या काही वर्षांत कमी झालेले पर्जन्यमान, हवामानातील बदलांमुळे आज आर्वी गावात हाताच्या बोटावर मोजता येतील इतके पानमळे शिल्लक आहेत. 

या पार्श्‍वभूमीवर तनिष्का व्यासपीठाने ग्रामस्थांना विश्‍वासात घेऊन गावामध्ये जलसंधारणाची चळवळ उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गाव आणि गावाच्या कडेला असलेल्या डोंगरी भागात व जिथे जिथे शक्‍य आहे, तेथे पाणी अडवून जिरवण्याचा निर्धार केला. त्यासाठी काही शासकीय अधिकारी, तज्ज्ञांना बोलावून महिला, ग्रामस्थांत प्रबोधन केले. त्यामध्ये पाऊस व इतर स्त्रोतांतून उपलब्ध होणारे पाणी नेमके कसे अडवावे, जिरवावे, त्याचा काटकसरीने वापर कसा करावा आदी प्रबोधन करून डोंगराकडेला ‘माथा ते पायथा’अशी जलसंधारणाची कामे प्रथम सुरू करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला. त्यानुसार आज सकाळी सात वाजता गावालगतच्या डोंगराकडेला डोंगरावरून येणाऱ्या नैसर्गिक वगळीत दगडी अनगड बांध बांधण्याचा प्रारंभ करण्यात आला.      

सकाळी साडेसहापासून तनिष्का सदस्यांसह आबालवृध्द ग्रामस्थ ट्रॅक्‍टर, छोटा हत्ती, जीप आदी चारचाकी वाहनांसह दुचाकीवरून सोबत घमेली, टिकाव, कुदळ, छोट्या कुदळी, खुरपी, पहारी आदी साहित्य घेऊन डोंगराकडेला जमा झाले अन्‌ ग्रामदैवत जोतिबाच्या नावानं चांगभलं म्हणत श्रमदानाला सुरवात केली. काही ज्येष्ठ व तरुण बांध घालत होते. तर महिला, मुली, लहान मुले परिसरातून दगड- गोटे गोळा करून आणून देत होते. 

काही लहान मुले आबालवृध्दांना ग्लासाद्वारे पाणी पुरवत होते. हा हा म्हणता सुमारे दोन तासांत पाच अनगड बांध उभे राहिले.

श्रमदानात तनिष्का गटप्रमुख मनीषा मुळीक, मीरा जगदाळे, शोभा जाधव, संगीता डोंबे, दमयंती डोंबे, गंगूबाई सावंत, अंजना डोंबे, भारती मोलावडे, मंगल यादव, संगीता येवले, कविता डोंबे, शामला जाधव, रूपाली डोंबे, वैशाली दळवी, संगीता राऊत, कुंदा औंधकर, दीपाली पवार, शोभा टोणे, सुरेखा जाधव आदी महिला, विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ सहभागी झाले होते. 

अंगातून घामाच्या धारा अन्‌ चेहऱ्यावर आनंद! 
बांध उभे राहताना तनिष्कांसह महिला, ग्रामस्थांच्या अंगातून घामाच्या धारा वाहताना चेहऱ्यावर आनंदही ओसंडून वाहत होता. अखेर ज्येष्ठ महिला, ग्रामस्थांनी चला ऊन वर आले, श्रमदान थांबवा. असंच श्रमदान उद्या, परवा नव्हे तर आपण दररोज करूया, असे आवाहन केल्यावर आबालवृद्धांनी श्रमदान थांबवले.