फलटणला ‘जलयुक्त’मधील बंधाऱ्यांना गळती

फलटणला ‘जलयुक्त’मधील बंधाऱ्यांना गळती

शेतकऱ्यांमध्ये पाणी टिकण्याची शंका; बाजरी काढणीत पावसाची अडचण

फलटण - तालुक्‍यात या वर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला असून, उत्तरा व हस्त नक्षत्राने शेतीला चांगलाच हात दिला आहे. पावसामुळे पाझर तलाव, सिमेंट बंधारे पूर्ण भरून वाहू लागले आहेत, विहिरींची पाणीपातळी वाढल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत जलयुक्‍त शिवार योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांना काही प्रमाणात गळती असल्यामुळे पाणी किती दिवस टिकणार? अशी शंका परिसरातील शेतकऱ्यांना आलेली आहे.

तालुक्‍यात सध्या सर्वत्र खरीप हंगामातील बाजरी पिकाची काढणी सुरू असून पावसाने त्यात बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत. तालुक्‍यात असलेल्या एक हजार ७०० हेक्‍टर बाजरीच्या पिकापैकी  ५० टक्‍के पिकाची काढणी झाली असून अन्य ५० टक्‍के बाजरी काढण्याच्या प्रतीक्षेत आहे. पण, दररोज येणाऱ्या पावसामुळे त्यात अडचणी निर्माण होत आहेत. तालुक्‍यात आलेल्या परतीच्या पावसाने सर्वत्र समाधान असले तरी शेतात पाणी साचल्याने कांदा, बाजरी, घेवडा, मूग, तूर आणि सोयाबीन पिकांचे नुकसान होणार आहे. मात्र, ऊस, फळबागांना फायदा होणार आहे. आगामी काळातील रब्बी हंगामासाठी झालेल्या पावसामुळे जमिनींची मशागत करणे शेतकऱ्यांना सुखकारक होणार आहे. 

गेल्या चार वर्षांपासून प्रथमच तालुक्‍यातील सर्व ओढे, नाले भरून वाहिले आहेत. पाझर तलाव, सिमेंट बंधारे तुडुंब भरले आहेत. किंबहुना ओसंडून वाहत आहेत. पण, काही सिमेंटच्या बंधाऱ्यांना गळती राहिल्यामुळे साठलेले पाणी किती दिवस टिकणार ? अशी शंका परिसरातील शेतकऱ्यांना आहे. ओढे, नाले वाहत आहेत. बंधारे पाण्याने भरलेले आहेत. परिणामी आदर्की, तरडगाव, उपाळे, मिरढे, दुधेबावी, राजुरी, मुळीकवाडी, धुमाळवाडी परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र आहे. तालुका अवर्षणप्रवण क्षेत्रात येत असल्याने सरासरी पर्जन्यमान शासकीय प्रमाणानुसार ३९२ मिलिमीटर आहे. तर आतापर्यंत सरासरी ४०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. पण, त्याही पुढे जावून गेल्या ३० वर्षांचे पावसाचे प्रमाण पाहता अंदाजाप्रमाणे सरासरी पर्जन्यमान ४६० मिलिमीटर गृहित धरले तरी आजअखेर सरासरी ८६ टक्‍के पाऊस झाल्याचे चित्र आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत तालुक्‍यात मंडलनिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः फलटण ५८८, आसू ३२५, बरड १९२, गिरवी २६५, तरडगाव ४८७, आदर्की ३२५, राजाळे ४९४, होळ २५२, वाठार निंबाळकर ५७०.

रब्बी हंगामासाठी मशागती सुरू 
रब्बी हंगामाच्या तोंडावर परतीचा पाऊस तालुक्‍यात सर्वत्र झाला आहे. काही भागांत रब्बी हंगामासाठी मशागती सुरू झाल्या आहेत. १५ ऑक्‍टोबरनंतर रब्बी हंगामातील ज्वारी पिकाची पेरणी होईल, अशी स्थिती आहे. तालुक्‍यात झालेल्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याची कोठेही गैरसोय नसल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com