जलयुक्त शिवार योजना एक चळवळ - सदाभाऊ खोत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

सातारा - जलयुक्त शिवार योजना ही योजना राहिली नसून, एक चळवळ बनली आहे. या चळवळीला बळ देण्यासाठी भोसरे (जि. सातारा) येथील सहा बंधारे बांधण्यासाठी 86 लाख रुपये उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. भोसरे गावात सहपालकमंत्री श्री. खोत यांनी श्रमदान केले. त्या वेळी ते बोलत होते. खोत म्हणाले, की भोसरे गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. येथील सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा इतिहास नव्या पिढीला माहिती व्हावा म्हणून त्यांचे भव्य स्मारक, तसेच ग्रंथालय उभारले जाईल. यातून नव्या पिढीला काम करण्यासाठी ऊर्जा मिळेल. या गावातील बालकांपासून ते वृद्धांपर्यंत श्रमदान करत आहेत. जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश हा पाणी अडवा, पाणी जिरवा व पाण्याचा योग्य वापर करा असा आहे. प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.