कामगारांसाठी नगरला रुग्णालय उभारणार - बंडारू दत्तात्रेय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

जामखेड - चौंडी येथील पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, नगर येथे कामगारांसाठी रुग्णालय उभारू, विडी कामगारांना घरबांधणीसाठी दीड लाख रुपये अंशदान देऊ, अशी आश्‍वासने केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी बुधवारी दिली.

जामखेड - चौंडी येथील पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, नगर येथे कामगारांसाठी रुग्णालय उभारू, विडी कामगारांना घरबांधणीसाठी दीड लाख रुपये अंशदान देऊ, अशी आश्‍वासने केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी बुधवारी दिली.

अहल्यादेवींच्या जयंतीनिमित्त चौंडी येथे झालेल्या कार्यक्रमात दत्तात्रेय बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख होते. पालकमंत्री प्रा. राम शिंदे स्वागताध्यक्ष होते.

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, उत्तर प्रदेशचे पशुसंवर्धनमंत्री सत्यपालसिंह बघेल, माजी मंत्री अण्णा डांगे, आनंदराव देवकते, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे, रामहरी रूपनर, नारायण पाटील, रामराव वडकुते व भीमराव धोंडे, माजी आमदार रमेश शेंडगे, ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर आदी उपस्थित होते. मेंढपाळांना "नाबार्ड'च्या माध्यमातून अंशदान देऊन, अधिकाधिक बेरोजगारांना रोजगार देण्याची ग्वाहीही दत्तात्रेय यांनी या वेळी दिली.

देशमुख यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. पंकजा मुंडे यांना उद्देशून ते म्हणाले, 'आरक्षण देण्याची घोषणा आपण निवडणुकीपूर्वी केली आणि सत्ता मिळविली. घोषणा पाळा आणि आरक्षणाचा निर्णय तात्काळ घ्या.''

त्यावर मुंडे म्हणाल्या, '"धनगड'मधील "ड'चे "र' करून धनगर करायला साठ वर्षे त्यांना दिली. आता धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सोयी देण्यासाठी आम्हाला पाच वर्षे द्या. पिवळ्या वादळामुळे राज्यात सत्तांतर झाले. पुढच्या निवडणुकीपूर्वी तुम्हाला आरक्षण मिळवून देणारच. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजू.''

आरक्षणाच्या घोषणा अन्‌ गणपतरावांचे आवाहन
धनगर समाजाला आरक्षणासंदर्भात बोलणाऱ्या वक्‍त्यांकडून ठोस आश्‍वासन मिळत नसल्याने उपस्थितांनी सभास्थळी घोषणा देत वारंवार गोंधळ केला. त्यांना शांत करण्यासाठी 92 वर्षांचे आमदार गणपतराव देशमुख यांनी तीन वेळा व्यासपीठावर उभे राहून सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले.